सोने-चांदीला झळाळी; दोन दिवसात सोन्याच्या भावात 1500 तर चांदीच्या दरात 6000 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजाराची सुरुवात या आठवड्यात तेजीने झाली. त्याचप्रमाणे सोने-चांदीलाही झळाळी आली आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात 1500 रुपये तर चांदीचे दर 6000 रुपयांनी वाढले आहेत. वायदे बाजारात ऑगस्ट महिन्याच्या सोन्याच्या वायद्यासाठी किंमतीत 0.6 टक्के वाढ होत, त्या 52,410 रुपये प्रतिग्रॅमपर्यंत पोहचल्या. तर चांदीच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ होत त्या 67,000 रुपये प्रतीकिलोवर पोहचल्या. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत 4 टक्के तर चांदीच्या किंमतीत 15 टक्के वाढ दिसून आली.

जागतिक बाजारातील तेजीमुळे वायदे बाजार आणि सराफा बाजारातील सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगावरील कोरोनाचे वाढते संकट, कमजोर होणारी डॉलरची स्थिती, अमेरिका-चीन तणाव यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीच्या गुतंवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या चार महिन्यात चांदीच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 18 मार्चला वायदे बाजारात चांदीची किंमत 33,580 रुपये प्रतिकिलोग्रॅम होती, ती आता 67,560 रुपये प्रतिकिलोग्रॅम झाली आहे.

सोन्या-चींदीच्या किंमतीत अशीच तेजी कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत चांदीचे भाव 75 हजार रुपये प्रतीकिलोपर्यंत पोहचतील, असे तजज्ञांनी सांगितले. तर सोन्याचे भाव 55 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोन्या-चांदीतील वाढती तेजी बघता 2021 च्या अखेरीपर्यंत आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 73 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत पोहचतील, अशी शक्यता बँक ऑफ अमेरिकेने व्यक्त केली आहे.