वर्षभरात सोने 50 टक्क्यांनी लकाकले; गुंतवणूक वाढली

वर्षभरात सोन्याचे दर तब्बल 50 टक्क्यांनी वाढले असून सोन्यात गुंतवणुकीसाठी चांगले दिवस असल्याचे समोर आले आहे. सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी सुवर्ण काळ आला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रिझर्व्ह बँकेनेही सोने तारण कर्जाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून एलटीव्ही म्हणजेच सोने तारण कर्ज ते मूल्य प्रमाण 75 वरून 85 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत सोने तारण ठेवून कर्ज घेतले तर 75 टक्क्यांऐवजी 85 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांत सोन्याने सुमारे 180 टक्के परतावा दिला आहे. यावरून भविष्यातही सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 2025 च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति ट्रॉय औंस 3 हजार 700 अमेरिकन डॉलरपर्यंत वाढेल आणि जर अमेरिकेत मंदी आली तर ती प्रति ट्रॉय औंस 3 हजार 880 डॉलरपर्यंत वाढेल असा अंदाज गोल्डमनने व्यक्त केला आहे. 2025 च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति औंस साडेचार हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असेही गोल्डमनने म्हटले आहे.