
इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगत सोने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करीत तब्बल 20 लाखांची रोकड आणि 30 तोळे लुटणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून रोकड, दागिने, आलीशान मोटार, मोबाईल असा 34 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्टला रात्री 9.30 ते पहाटेपर्यंत जांभुळवाडी रस्त्यावर घडली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी व्यास गुलाब यादव (वय 34, रा. आंबेगाव, मूळ- बिहार) भैय्यासाहेब विठठल मोरे, किरण कुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, ऊमेश अरुण ऊबाळे, शाम अच्युत तोरमल, सुहास सुरेश थोरात, रोहीत संभाजी पाटील, अशोक जगन्नाथ सावंत यांना अटक करण्यात आली. नंदकिशोर कांतीलाल वर्मा (वय 41, रा. दत्तनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. यावेळी एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर उपस्थित होते.
नंदकिशोर हे सोने-चांदीचे व्यापारी असून 26 ऑगस्टला रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास गुन्ह्यातील मुख्य आरोपी मित्र व्यास यादव यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आलीशान मोटारीतून आलेल्या पाचजणांनी नंदकिशोर यांना आम्ही इनकम टॅक्स अधिकारी आहोत. तुम्ही इनकम टॅक्स भरत नाही, तुम्ही बेकायदेशीरपणे सोन्याचा धंदा करता, सरकारची फसवणूक करता, तुमच्यावर इनकम टॅक्सची रेड आहे’ असे म्हणत दोघांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्यानंतर त्यांना दूरवर नेत हत्यारांचा धाक दाखवत 75 लाखांची मागणी केली. आरोपींनी त्यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांना 20 लाख रुपये आणि 30 तोळे सोने आणण्यास सांगितले. त्यानुसार नंदकिशोर यांनी मित्र व्यास यादव याला घरी पाठवत रोकड आणि सोने आणून चोरट्यांकडे दिले.
याप्रकरणी भारती विद्यापीठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करताना पथकाचे अंकुश कर्चे यांना नंदकिशोर यांचा मित्र व्यास यादव गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मित्र नंदकिशोर यांच्याकडे सोने व पैसे असल्याचे माहीती असल्यामुळे 25 दिवसांपूर्वी त्यांना लुटण्याचे ठरवले होते. त्यानुसार साथीदारांच्या मदतीने इनकम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून नंदकिशोर यांना साथीदारांच्या मदतीने लुटल्याचे सांगितले. तपासात इतर आरोपी कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. आरोपी देवगड-निपाणी हायवेवर थांबले असल्याचे दिसताच पथकाने त्यांच्या मोटारीचा पाठलाग केला.
पोलीस जखमी झाले, पण आरोपींना सोडले नाही
आरोपी गाडी थांबवित नसल्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे आणि शिवदत्त गायकवाड गाडीला लटकले. त्या अवस्थेत चोरट्यांनी 50 मीटरपर्यंत कर्मचाऱ्यांना फरफटत नेले. त्यानंतर पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांनी धावत्या गाडीच्या काचेवर हाताने जोरदार प्रहार केल्याने आरोपींनी मोटार थांबविली. अमंलदार हर्षल शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक पोलीस उपनिरीक्षक रविन्द्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर शिवदत्त गायकवाड यांनी केली.
सोने विक्री व्यापाऱ्याचे अपहरण करून लूटमार करणाऱ्या टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून आरोपींना अटक केली आहे. तपास पथकातील सर्व कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या योग्य समन्वयामुळे गुन्ह्याची तत्काळ उकल झाली आहे. दरम्यान, अशाप्रकार फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी लवकर पोलिसांशी संपर्क साधल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात.
– सागर पाटील, पोलीस उपायुक्त झोन दोन





























































