उरणमधील हिंद टर्मिनलमध्ये साडेपाच कोटीचे सोने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुकर ठाकूर, उरण

येथील हिंद टर्मिनल गोदामातून भंगाराच्या नावाने तस्करीच्या मार्गाने आणण्यात आलेल्या 19 किलो सोन्याची बिस्कीटे महसुल गुप्तवार्ता संचालनालय(डीआरआय) जप्त केली आहेत. 24 कॅरेटच्या 163 सोन्याच्या बिस्कीटांची किमंत 5 कोटी 54 लाख रुपये आहे.मागील तीन दिवसांपासून भंगाराच्या नावाखाली लपवून आणण्यात आलेल्या कंटेनरमधील सोन्याचा डीआरआयचे अधिकारी कसून शोध घेत होते.

उरण तालुक्यातील भेंडखळ गावाजवळ हिंद टर्मिनल आहे.या कंटेनर यार्डमध्ये मे.शौर्या एक्झीम अ‍ॅण्ड कन्साईन कंपनीच्या नावाने मेसर्स अल साब अल वसीम मेटल यूएई यांनी हेव्ही मेटल स्व्रॉबच्या नावाने कंटेनरमधुन भंगार पाठविण्यात आले होते. कंटेनरमध्ये भरण्यात आलेल्या भंगाराच्या लोखंडी पाईपात 10 ग्रॅम वजनाची सोन्याची 163 बिस्कीटे वेगवेगळ्या कंटेनरमध्ये मोठ्या शिताफीने लपविण्यात आली होती. रबरी सोल्यूशन वेस्टनात गुंडाळून आणि त्यावर नटबोल्ट फिट करुन तस्करी मार्गाने पाठविण्यात आलेल्या या सोन्याचा सुगावा महसुल गुप्तवार्ता संचालनालय विभागाला खबर्‍यामार्फत लागला होता.विभागाच्या अधिकार्‍यांनी हिंद टर्मीनलमध्ये मागील तीन दिवस संशयित कंटेनरची तपासणी करण्यास सुरुवात केली होती.

भंगारातील लोखंडी पाईपच्या वजन आणि आणि त्यावर असलेले रबरी सोल्यूशनचे वेष्टन यामधील तफावत आणि संशयामुळे अधिकार्‍यांनी वेष्टन दूर केले.वेष्टन दूर करताच त्यामध्ये अगदी बेमालुनपणे दडविण्यात आलेले सोन्याचे घबाड नजरेत पडले. अशा 17 मोठ्या आणि 3 छोट्या पाईपामध्ये ठेवण्यात आलेल्या बंडळात लपवून ठेवण्यात आलेले 19 किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. 24 कॅरेटच्या 163 सोन्याच्या बिस्कीटांची किंमत बाजापेठेत 5 कोटी 54 रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी शौर्य एक्झिमचे मालक राजेश भानुशाली यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.