
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक अशांतता वाढत आहे. आतापर्यंत युद्धाच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनेचांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र, हे युद्ध याला अपवाद ठरले आहे. या युद्धाच्या काळात सोने-चांदीचे दर वाढण्याऐवजी त्यात घसरण होत आहे. त्यांच्या उच्चांकापासून त्यात प्रंचड घसरण झाली आहे. तसेच जागतिक परिस्थितीचा परिणाम या दरांवर होत असल्याने त्यात चढउतार होत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा सोनेचांदीच्या दरात घसरण झाली आहे.
वायदे बाजारासह सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सराफा बाजारात ताज्या दरांनुसार ९९९ शुद्धतेच्या २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १४७,४८९ पर्यंत घसरला आहे. तर चांदीचा भाव आता २३१,००० प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १३५,००० आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोने तब्बल १,४१० ने स्वस्त झाले आहे.
वायदे बाजारातही युद्ध आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम दिसून आला आहे. वायदे बाजारात सोन्याचांदीचे दर सकाळी घसरले होते. मात्र, दुपारनंतर दर वाढले आहेत. त्यामुळे दुपारी 2.45 वाजता सोन्याचे दर 690 रुपयांनी वाढून1,50,671 वर व्यवहार करत होते. तर चांदीचे दर 650 रुपयांनी वाढून ते 2,34,029 वर व्यवहार करत होते.


























































