गुदद्वारात सोनं लपवून आणलं, दुबईहून आलेल्या प्रवाशांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

तामीळनाडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कस्टम विभागाने दोन प्रवाशांना अटक केली आहे. हे प्रवासी दुबईहून हिंदुस्थानात आले होते. कस्टम विभागाला त्यांनी सोन लपवून आणल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

सोन्याची तस्करी करण्यासाठी ते वितळवून वेगळ्या पद्धतीने आणण्याच्या या पद्धतीत वाढ झाल्याचं निरीक्षण कस्टम विभागाने नोंदवलं आहे. शनिवारीही असाच प्रकार घडला. चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवासी सोनं लपवून आणत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. शनिवारी दुबईहून त्यांचं विमान उतरलं आणि त्यांची तपासणी करण्यात आली. आपल्याकडे सोनं आहे हे कळू नये यासाठी या दोघांनीही आपल्या गुदद्वारात ते सोनं लपवलं होतं. दोघांकडूनही तब्बल 909 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं. बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत 36 लाख रुपये आहे.

मोहम्मद यासिन आणि शेख अब्दुल्लाह अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने सोनं वितळवून मानवी विष्ठेप्रमाणे आपल्या अंतर्वस्त्रात लपवून आणलं होतं. आपलं पोट खराब झालं असून त्यामुळे कपड्यातच विष्ठा केल्याचं त्याने कस्टम अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली होती आणि त्याची चलाखी पकडली गेली होती.