रविवार पेठेत मोटारीतून पाऊण किलो सोने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवार पेठेत खरेदीसाठी आलेल्या एका सराफी व्यावसायिकाच्या मोटारीतून तब्बल पाऊण किलो सोने ठेवलेली  बॅग चोरट्यांनी पळवून नेली आहे. घटनास्थळी गुन्हे शाखा आणि  पोलिसांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी एका सराफाने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार सराफ असून   ते रविवार पेठेत खरेदीसाठी आले होते. त्यांनी 800 ग्रॅम सोने खरेदी करून मोटारीत ठेवले होते. त्यानंतर ते गुजराती शाळेजवळ मोटार उभी करून थांबले होते.

 त्यावेळी तेथे आलेल्या चोरट्यांनी सराफी व्यावसायिकाला  गाडीतून ऑइल गळत असल्याची बतावणी केली. त्यामुळे ते  मोटारीतून उतरून पाहणी करीत असताना  चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून पाऊण किलो सोने असणारी बॅग चोरून नेली. काही क्षणात चोरी झाल्यामुळे त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही. त्यानंतर दागिन्यांची बॅग न दिसल्यामुळे त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली.