
उदय जोशी । बीड
बीड शहरातील बशीरगंज परिसरात सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सिजर हेअर सलुनच्या बापू झांबरे व विशाल वाघमारे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवला आहे. देशसेवेसाठी प्राणाची आहुती पणाला लावणाऱ्या आजी-माजी सैनिकांची सोन्याच्या वस्ताऱ्याने मोफत दाढी करण्याचा उपक्रम 20 जानेवारीपासून सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी व्यवसायामध्ये नाविण्यता आणत सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्याची अभिनव संकल्पना बशीरगंज येथील बापू झांबरे व विशाल वाघमारे यांच्या सिजर हेअर सलुनने सुरू केली आहे. नोकरी सोडून व्यवसायात उतरलेल्या बापू झांबरे व विशाल वाघमारे यांच्या या सलुनला बीडकरांनी डोक्यावर घेतले आहे. सामाजिक बांधिलकी जपत बापू झांबरे व विशाल वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 20 ते 26 जानेवारी दरम्यान आजी-माजी सैनिकांची सोन्याच्या वस्ताऱ्याने मोफत दाढी करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या सलुनला गेल्या तीन दिवसांपासून भरपूर प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यासह राज्यभरात पुन्हा एकदा सिजर हेअर सलून चर्चेत आले आहे.
देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. आपल्याकडूनही या सैनिकांची सेवा घडावी, हा या मागचा हेतू आहे. या उपक्रमात जिल्हाभरातून आजी-माजी सैनिक सहभागी होत आहेत. यापुढेही 26 जानेवारीपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून आजी-माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे सिजर हेअर सलुनचे बापू झांबरे व विशाल वाघमारे यांनी केले आहे.

























































