सोनं खरेदी करण्याआधी ही बातमी वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दरम्यान जास्तीतजास्त सोन्याची खरेदी ही दिवाळीतच केली जाते. सणांच्या दिवसात सोन्याचा दर वाढतो. मात्र असे असले तरी सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जाते. पण ही सोने खरेदी आपल्याला महागात पडू शकते कारण भेसळ युक्त सोने या काळात बाजारात आणले जाते.

सोन्यामध्ये पावडर मिसळून काही सोनार त्याची विक्री करतात आणि स्वत:चा फायदा करुन घेतात. त्यामुळे मार्किंग न बघता जर थोड्या कमी दरात सोने खरेदी केले तर ते महागात पडते. त्याच प्रमाणे मुंबईमध्ये अशा प्रकारे काही सोनार डिस्काउंटच्या नावाखाली ग्राहकांना लुबाडतात. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, सोन्यामध्ये जी भेसळ होते त्या मध्ये पॅलेडीअम पावडरचा अति वापर केला जातो. ही पावडर सोन्यामध्ये पूर्णपणे मिसळून जाते. सिमेंटसारखी दिसणारी ही पाउडर विदेशातून आयात केली जाते. ही भेसळ सुरुवातीला चैनी सारख्या दागिन्यात केली जायची. आता तर ही भेसळ अन्य दागिन्यात केली जात असल्याची अशी सूचना मिळाली आहे. कुमार जैन यांनी या धोक्यातून वाचण्याचा एक उपाय सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, ग्राहकांनी फक्त हॉलमार्क दागिने खरेदी करावेत. या व्यतिरिक्त स्वस्त दागिन्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये. ग्राहकांनी दुकानदारांकडून पक्के बिल घेणे, त्याचप्रमाणे यामध्ये सोन्याची शुद्धता किती आहे याचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

सोन्याचे दागिने खरेदी करताना शुद्धतेचे प्रमाणपत्र घेणे जरुरी आहे. या प्रमाणपत्रात सोन्याच्या कॅरेट क्वालिटीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ग्राहकांनी सतत जागरुत राहणे आवश्यक आहे.