उत्तम प्रशासक

379

>> शैलेश माळोदे

विज्ञान संस्थांच्या प्रशासनावर पकड ठेवून चांगल्या प्रकारे कार्यरत राहता येतं, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ म्हणजे प्रा. व्ही. एस. राममूर्ती.

विज्ञान संशोधन आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी लिलया सांभाळणं तसं कठीणच; परंतु काही लोकांना यामध्येदेखील पारंगतता प्राप्त करता येते. ही पारंगतता अंगी बाणवल्यामुळे निवृत्तीचं वय ओलांडल्यावरदेखील विज्ञान संस्थांच्या प्रशासनावर पकड ठेवून चांगल्या प्रकारे कार्यरत राहता येतं, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ म्हणजे प्रा. व्ही. एस. राममूर्ती.

हिंदुस्थानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांनी तब्बल 11 वर्षे काम पाहिलं. खरं तर एकदम दाक्षिणात्य व्यक्तिमत्त्वाचे शास्त्र्ाज्ञ म्हणून त्यांनी बऱयाचदा हसत हसत कोटय़ा करीत मूळ प्रश्नांमध्ये उपस्थित केलेल्या मूळ मुद्दय़ांना बगल दिली. परंतु तसे प्रा. राममूर्ती बोलायला बऱयापैकी मोकळे होते. 2 एप्रिल 1942 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी आताच्या तामीळनाडू राज्यात जन्मलेल्या राममूर्तींनी 77 पावसाळे पाहिले आहेत. ‘मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी आणि मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर ते भाभा अणुसंशोधन केंद्रात म्हणजे तत्कालीन ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बेच्या प्रशिक्षण स्कूलमध्ये दाखल झाले 1963 साली. याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मी ज्या वेळी अणुऊर्जा विभागात दाखल झालो तेव्हा डॉ. भाभा आणि डॉ. साराभाई दोघेही या विभागात कार्यरत होते. त्यांचं मार्गदर्शन समारंभापरत्व किंवा एखाद्या बैठकीच्या वेळी आम्हा तरुणांना होत असे. मी त्या वेळी या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत असे. भाभा आणि त्यानंतर साराभाई गेल्यावर होमी सेठना यांच्याकडे अणुऊर्जा विभागाची सूत्रे आली. पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1974 मध्ये अणुचाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विभागाने ‘स्मायलिंग बुद्धा’ प्रकल्पाद्वारे पोखरणला 18 मे 1974 ला प्रथम अणुचाचणी यशस्वी केली. मी त्यासाठी निवडलेल्या गटाचा सदस्य होतो.’

प्रा. राममूर्ती 1989 पर्यंत अणुऊर्जा विभागातच विशेषतः बीएआरसीतच कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती विभागाच्या अखत्यारीतच असलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्सच्या संचालकपदी करण्यात आली. त्यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘अणुऊर्जा प्रकल्पाद्वारे आण्विक आणि रेणवीय गुच्छ (क्लस्टर्स) आणि लो एनर्जी ऍक्सलेटर प्रकल्याची उभारणी करण्याचं काम या कालावधीत माझ्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. त्याचबरोबर 3 एम.व्ही. ऍक्सलेटर सेंटरची स्थापना संस्थेत करण्यात आली. अणुसंशोधनासाठी युरोपियन संघटना जिनिव्हा (meve& CERN) येथे असून त्यांनी त्यावेळी जड आयर्न ऍक्सलेटर्सचा वापर करून एक उच्च ऊर्जा अणु भौतिकीचा कार्यक्रम राबविला होता. मी त्यात सहभागी होतो.’ प्रा. राममूर्ती यांनी अणुविखंडन भौतिकी क्षेत्राच्या प्रायोगिक आणि सैद्धांतिक अशा दोन्ही बाबतीतील संशोधनात योगदान दिले असून आण्विक ‘शेल इफेक्टस्’च्या बाबतीत त्यांना विशेष नावाजलं जातं. त्याचबरोबर अणुस्तरावरील घनता आणि प्री इन्विलिब्रियम फिशन (विखंडन) आणि सब-बॅरिअर फ्यूजन डायनॅमिक्स या क्षेत्रातदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलंय. त्यांचे शोधनिबंध अनेक प्रथितयश शोधनियतकालिकातून तसेच 1986 साली प्रकाशित ‘न्यूक्लिअर रेडिएशन डिटेक्टर्स’ या त्यांच्या पुस्तकातून प्रसिद्ध झालेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सामाजिक उपयोगाच्या अनुषंगानेदेखील त्यांचे लेख प्रकाशित झालेत.

अशा प्रा. व्ही. एस. म्हणजेच वलंगीमन सुब्रमणियन राममूर्ती यांनी 2006 साली केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर ते 2009 पर्यंत दिल्ली येथील आंतरविद्यापीठ ऍक्सलेटर केंद्राचे संचालक होते. त्यानंतर ते बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक म्हणून पाच वर्षे म्हणजे 2014 पर्यंत कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांना संस्थेचे मानद प्राध्यापकपद देण्यात आले. त्यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या नेमणूक आणि मूल्यांकन मंडळाचं अध्यक्षपद तसेच व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेच्या अणुउपयोजनाविषयीच्या सल्लागार गटाचे अध्यक्षस्थानही भूषविलंय.

प्रा. व्ही. एस. राममूर्ती अद्यापही चांगलेच ऑक्टिव्ह आहेत. तरुणांना प्रोत्साहित करण्यास नेहमीच तयार असतात. 1987 साली त्यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (इन्सा) च्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यांनी या रूपात संस्थेची खूप सेवा केलीय. 1991 साली त्यांना इंडियन ऍकॅडमीच्या सदस्यपदी निवडले गेले. नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया आणि इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचेही ते सन्माननीय सभासद आहेत. 2005 साली हिंदुस्थान सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा तिसऱया क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. ‘वर्ल्ड ऍकॅडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो आणि ‘रशियन ऍकॅडमी ऑफ नॅचरल सायन्सेस’चे परदेशी सदस्य म्हणूनही ती कार्यरत आहेत. प्रा. राममूर्ती म्हणतात, ‘हिंदुस्थानच्या विज्ञान, तंत्रज्ञान, इनोवेशन धोरणाचा फायदा तरुणांनी उचलायला हवा. देशामध्ये विज्ञान संशोधनास वाव देण्यासाठी विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन स्तरावरच त्यांना त्या दृष्टीने प्रोत्साहित करायला हवं. चांगले शिक्षक चांगला पगार देऊन यासाठी आमंत्रित करायला हवेत. जीवनात पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग महत्त्वाचा ही बाब शासन आणि संस्थाचालक दोहोंनी ध्यानात घ्यायला हवी.’

 

आपली प्रतिक्रिया द्या