
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई-पुण्यात संततधार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. लोणावळा घाटात एका मालगाडीचे डबे घसरून मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पहाटे 4.20 च्या दरम्यान झालेल्या या घटनेनंतर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन, भुसावळ-पुणे एक्सप्रेस, मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई पॅसेंजर अशा महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाचा चांगलाच फटका पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.
दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. लोणावळा घाटातून मालगाडीचे डबे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यास अडथळे निर्माण होत आहे.






























































