
मुंबई- बेंगळुरू महामार्गावर सुस खिंड येथे मालवाहू ट्रकचा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य ताबडतोब सुरू करून त्या दोघांना वाचवण्यात आलं आणि ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान हा अपघात झाला. रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणाऱ्या मार्गावर मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामुळे वाहनचालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी अवस्थेत होते.
त्याचवेळी तिथे पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा वापर करून वीस मिनिटात दोन्ही जखमींना बाहेर काढून तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दत्तू आंबू गोळे (60) व सुरज सुर्वे (30) अशी यांची नावे असून हे सातारा भागातील रहिवाशी असल्याचे समजते.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान ओंकार देशमुख, विकास कुटे यांनी सहभाग घेतला.



























































