गुगल सांगणार तुमचे भविष्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

परदेशात वाढते गुन्हे रोखण्यासाठी तपास यंत्रणांनी गुगलची मदत घेतली आहे. त्यात त्यांना चांगले यश आले. तसेच भविष्यात होणाऱ्या घटना, माणसाचे व्यक्तिमत्व त्यात होणारे बदल, आवड, व्यवसायाची दिशा याबाबत गुगलचे अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळे गुगलकडे असणाऱ्या आपल्या माहितीवरून गुगल आपले भविष्य काही संकेदात सहज सांगू शकतो. आपली कोणती माहिती गुगलकडे आहे, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. गुगल मात्र आपल्या आपल्या प्रत्येक गोष्टावर नजर ठेवून असतो, असे सायबर क्राइम विषयातील तज्ज्ञांनी सांगितले.

लोकेशन बंद केले असेल तरीही गुगल आपल्याला शोधू शकतो. एवढेच नव्हे तर आपली प्रत्येक हालचाल आणि काम याची नोंदही तो घेत असतो. शनिवार- रविवारी एखदी व्यक्ती प्रवास करत असेल. ठराविक रेस्टाँरंटमध्ये जात असेल, तर गुगलला त्याचे भविष्य माहीत आहे. त्याची जेवणाची आवड, प्रवास, छंद, प्रवासाचा मार्ग, तो कोणाला भेटणार आहे याबाबत गुगल काही सेंकदात माहिती देऊ शकतो. तसेच आपल्याला येणारे ई मेल आणि नोकरीसाठी आपण केलेले अर्ज तसेच ऑनलाईन केलेली खरेदी यावरही गुगलचे लक्ष असते. त्या माहितीवरून तो कोणचेही भविष्य वर्तवू शकतो. गुगलने वर्तवलेल्या अशा भविष्यांमुळे परदेशात अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

तुमच्या या गोष्टींची गुगलकडे माहिती
नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक, आवडते गुगल सर्च, भेट दिलेल्या वेबसाइट, तुम्ही कोठे आहात, गेल्या काही वर्षांत तुम्ही केलेला प्रवास, आवडते खेळ, गाणी, सिनेमा, तुमच्या नोकरीची माहिती आणि कामाचे स्वरुप, ऑफिसचा आणि घरचा पत्ता, मेलवरील माहिती, वॉइस रेकॉर्डिंगचा डेटा, तुमच्या आवडी-निवडी, फोटो डेटा, फोनबुक, संपर्क क्रमांक, तुमच्या वापरात असणारे अॅप, तुमचे आवडते अॅप, वस्तूंची खरेदी, काही दिवसांपासून तुम्ही करत असलेले काम. आतापर्यंत गुगलने तुमची कोणती माहिती जमवली आहे आणि ती कोणाला शेअर केली आहे याची माहिती https://takeout.google.com/settings/takeout या लिंकवर जाऊन मिळणार आहे.

असे होते गुगलचे काम
आपण वापरत असलेले अॅप गुगलला आपले लोकेशन पाठवत असतात. त्यामुळे लोकेशन बंद केले तरी आपण कोठे आहोत हे गुगलला माहीत असते. अंड्राइड फोन तासाला ४० तर आयफोन तासाला ४ वेळा गुगलला आपल्या लोकशनबाबत माहिती पुरवत असतात. तुम्हाला येणारे मेल, सर्च करणाऱ्या वेबसाइट यावरून गुगल तुमच्या आवडी-निवडीची नोंद ठेवतो. एखाद्या अॅपमध्ये किंवा क्लाउडमध्ये अपलोड केलेल्या फोटोंची नोंदही गुगलकडे होते. या फोटोंसह फोटो कुठे, कधी आणि कोणत्या फोनच्या किती मेगा पिक्सल कॅमेरातून काढले ही माहितीही गुगलला मिळते. सोशल साइडवरून तुमचे मित्र, सहकारी, नातेवाईक, तुमच्या आवडत्या पोस्ट, तुम्ही कोणाला टॅग करता यावरही गुगलचे लक्ष असते. फोन बदलल्यानंतरही तुमचा क्रमांक तोच राहतो. त्यामुळे तुमची माहिती गुगलकडे सेव्ह राहते. त्यामुळे फोन बदलला तरी नवीन फोनशी गुगल ती लिंक करतो. लोकांची माहिती मिळवण्यासाठी अनेक अॅप एक्सेसची परवानगी मागतात. ती दिली की त्यांना सहज सर्व माहिती हाती लागते. मोबाईलमधून सिम काढला तरी वायफाय किंवा हॉटस्पॉट कनेक्ट केल्यावर आपण कुठे आहोत हे गुगलला समजते. आपण प्रवासात असल्यास बदलणाऱ्या जागांवरून आपण बस, ट्रेन, गाडी किंवा विमानाने प्रवास करत आहोत याची माहिती गुगलला मिळते. ऑनलाईन तिकीट बुकींग केल्यास आपला प्रवास, तसेच मोबाईलवर लावलेले रिमांडर यावरून गुगलला आपल्या भविष्यातील योजनांची माहिती मिळते.

या सर्व माहितीवरून गुगल आपले भविष्य काही सेंकदात सांगू शकतो. या माहितीची वर्गवारी करून त्याचे काही ट्रेंडमध्ये विभागणी करून गुगल भविष्य वर्तवतो आणि आपल्याच माहितीवर ते आधारीत असल्याने ते अचूकही असते.