
गुगल मॅप हे अॅप अनेकांसाठी पत्ता शोधण्यासाठी महत्वाचे साधन झाले आहे. युजर्सना दररोज उपयुक्त ठरतील असे नवे नवे फीचर्स सादर करत असते. गुगलने 2022 च्या सप्टेंबरमध्ये यूएस, कॅनडा आणि युरोप या देशांमध्ये इंधन बचत हे फीचर आणले होते. हे फीचर आता हिंदुस्थानात ही वापरता येणार असल्याची घोषणा गुगलने केली आहे.
या नव्या फीचरमध्ये वाहनाच्या इंजिननुसार कोणत्या मार्गाने गेल्यास इंधन बचत करता येईल हे सांगते. फोनमध्ये हे फीचर सुरू केल्यास इंधन बचतीसोबतच निवडलेल्या मार्गावरील वाहतुककोंडी आणि रस्त्यांचा दर्जा दर्शवते. गुगल मॅप अनेकदा कमी वाहतुककोंडी असलेले पर्याय दाखवते. पण या नव्या फीचरमुळे आता केवळ जलद मार्गच दाखवत नाहित तर कोणत्या मार्गाने गेल्यास इंधन बचत होईल याचे ही पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
हे फीचर बंद केल्यास तुम्हाला पूर्वीप्रमाणे इंधन बचतीचा पर्याय न सांगता केवळ जलद मार्ग उपलब्ध करून देईल. मात्र फीचर बंद असतानाही फोन स्क्रीनवर कोणत्या मार्गाने गेल्यास इंधन बचत होऊ शकते याचा पर्याय दाखविण्यासाठी हिरव्या पानाचे चिन्ह दाखवण्यात येईल. या पर्यायावर इंधन बचत तसेच इंजिनची उर्जा कशी कमी खर्च करता येईल यावर भर देण्यात आले आहे.
कसे वापराल नवे फीचर?
Google Maps उघडा. त्यामध्ये तुमचे डेस्टिनेशन टाकून, स्क्रीनवर टॅप करा. स्क्रीनच्या तळाशी दिशानिर्देशकाच्या आयकनवर टॅप करा. तेथे इंजिनसाठी पर्याय उपलब्ध होईल. इंजिन प्रकार निवडा. यापुढे स्क्रीनवर तुम्हाला इंधन बचतीसाठी पर्याय उपलब्ध होतील.




























































