
ठाण्यात अक्षरशः गुंडाराज सुरू असून वागळे इस्टेटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहणाऱ्या तरुणाला तडीपार गुंडाने कारखाली चिरडून ठार मारल्याची भयंकर घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव विठ्ठल गायकर असून गाडीखाली चिरडणाऱ्या निर्दयी आरोपीचे नाव संतोष पवार असे आहे. मित्राबरोबर असलेल्या जमिनीच्या जुन्या वादातून निष्पाप विठ्ठलचा बळी गेला असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान संतप्त रहिवाशांनी श्रीनगर पोलीस ठाण्याला घेराव घालून आपला रोष व्यक्त केला. या घटनेनंतर काही तासांतच मारेकरी संतोष पवार याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. या हत्येमुळे वागळे इस्टेट परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाण्यातील विठ्ठल गायकर यांचे मित्र शंकर वरठे आणि संतोष पवार यांच्यात २०२१ पासून जमिनीचा वाद होता. त्यातून झालेल्या वादावादीनंतर संतोष पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला. एवढेच नव्हे तर तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याने त्याला पोलिसांनी तडीपारदेखील केले होते. मात्र काही कालावधीनंतर संतोष हा पुन्हा ठाण्यात आला. शंकर वरठे हे त्यांचा मामेभाऊ बाबू बरफ, वसंत टोकरे व विठ्ठल गायकर हे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास वागळे इस्टेट भागात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी गेले होते.
बाबू बरफ, विठ्ठल गायकर व शंकर वरठे यांना सिगारेट पिण्याची तलफ आल्याने ते पानटपरीवर गेले. त्यावेळी मुख्य आरोपी संतोष पवार याने शंकर वरठे याचा मित्र वसंत याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबू, विठ्ठल व शंकर वरठे हे तिघेही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी संतोष पवारचा मित्र महेश पाटील याने बाबू बरफला ठोश्याबुक्क्यांनी मारले. दरम्यान शंकर वरठे याने संतोष पवार याच्याशी भांडण करू नको.. जुना वाद मिटवून टाका अशी विनंती केली.
भांडणावरून वाद सुरू असतानाच त्याठिकाणी उभ्या असलेल्या विठ्ठल गायकर व शंकर वरठे यांच्या अंगावर संतोष पवार याने कार घातली. यावेळी शंकर वरठे यांना गंभीर दुखापत झाली. मात्र निष्पाप विठ्ठल गायकर हा कारखाली चिरडला गेला.
या निर्दयी संतोषने कोणतीही दयामाया न दाखवता दोन ते तीन वेळा विठ्ठलच्या अंगावरून गाडी नेली व पोबारा केला. ही घटना एवढी भीषण होती की विठ्ठलचा मेंदूच बाहेर आला. रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर बऱ्याच वेळ पडून होता.
तीन मुलींनी पिता गमावला
शंकर आणि संतोषमधील जुन्या वादामध्ये कोणताही संबंध नसतानादेखील विठ्ठल याला गाडीखाली ठार मारल्याने ऐन सणासुदीच्या काळात त्याचे कुटुंब हादरले आहे. विठ्ठल हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याला तीन मुली असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.