
गोराई, मनोरी चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी पालिका स्कीड स्टीअर लोडरचा वापर करणार आहे. शिवाय चौपाट्यांवर रात्रीच्या वेळी दिसू शकणारे कचऱ्याचे डबेही बसवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर नजर ठेवण्यासाठी त्यांना अँड्रॉइड घड्याळही देण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही किनाऱ्यांची स्वच्छता चांगल्या प्रकारे होणार आहे.
मुंबईत गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी, गोराई अशा प्रमुख चौपाट्या आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून या चौपाट्यांची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आता मनोरी गोराई समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका आता दुप्पट यंत्रसामग्री वापरणार आहे. या दोन्ही समुद्र किनाऱ्यांवर आता विविध उपकरणांनी सज्ज असलेली ‘स्कीड स्टीअर लोडर’ हे यंत्र वापरण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिका प्रत्येक दिवशी 45 हजार 975 रुपये खर्च करणार असून दरवर्षी त्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
वाहनांवरही जीपीएस सिस्टम
वाहनांवरही आता जीपीएस सिस्टम लावण्यात येणार आहे. व्हेकल मॉनिटरिंग सिस्टमच्या आधारावरच कंत्राटदाराला शुल्क देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना तक्रारी करता याव्यात म्हणून नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. रोड स्किपिंग, रॉक बकेड, ग्रॅपल बकेट अशी विविध उपकरणे या मशिनमधील असतील. या कामासाठी राम इंजिनिअरींग अॅण्ड कंस्ट्रक्शन कंपनी या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समुद्र किनाऱ्यांकर रात्रीच्या केळी फिरायला येणाऱ्या कचऱ्याचे डबे दिसावे म्हणून सौर ऊर्जेने परावर्तीत होणारी झाकणे असलेले कचऱ्याचे डबेही ठेवण्यात येणार आहे.




























































