
ओपीची, मातीची मूर्ती असा वाद सुरू असताना गोरेगावमधील मिठानगरच्या राजाने पर्यावरण रक्षणाचा वसा घेऊन एक महत्त्वपूर्ण संदेश मुंबईकरांना दिला आहे. येथील बाळ मित्र मंडळ यंदापासून बाप्पाच्या तब्बल 25 फुटी टिश्यू पेपरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे.
पीओपीच्या समस्येमुळे आणि पर्यावरण रक्षण किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला पटले. त्यामुळे यंदापासून आम्ही टिश्यू पेपरच्या 25 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाळ मित्र मंडळाचे अध्यक्ष ऋषीकेश पालकर यांनी दिली. ही मूर्ती पेशवा आर्टस्चे राजेश मयेकर साकारत आहेत. बाप्पाची आरासही अतिशय साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून याबाबत आम्ही इतर गणेश मंडळांमध्येही जनजागृती करणार असल्याचेही मंडळाने म्हटले आहे.
आरोग्य शिबीर आणि मुलांच्या कलागुणांना वाव
मंडळाच्या वतीने यंदाही आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रक्तदान शिबीरही पार पडणार आहे. आरोग्य शिबिरात संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय दातांची तपासणी आणि त्यावरील उपचार करण्याच्या दृष्टीने तज्ञ डॉक्टरांमार्फत सल्लामसलत करण्यात येईल. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकर यांनी दिली.