
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या बोगद्यामुळे बाधित होणाऱया जमिनीच्या बदल्यात पालिका चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ प्रकल्पालगत 19.43 हेक्टर जागेवर वनीकरण करणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिका सल्लागार नेमणार असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
मुंबईत प्रचंड वाढलेल्या वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी ‘गोरेगाव-मुलुंड लिंक रोड’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण 12.2 किमी आहे. यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4.7 किमीचा बोगदा काढण्यात येणार आहे. तर फिल्मसिटीतून 1.6 किमीचा ‘कट ऍण्ड कव्हर’चा बोगदा काढण्यात येणार आहे. या लिंक रोड प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्य जीव मंडळाकडून वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत परवानगी मिळाली असून वन कायद्यांतर्गत परवानगी मिळवण्यात येणार आहे. दरम्यान, चंद्रपूर येथे वनीकरण करण्यासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही करण्यासाठी पालिका सल्लागाराची नेमणूक करणार आहे. यासाठी नागपूर येथे कार्यरत असणारे वकील सौरभ पशिने यांची नेमणूक केली जाणार आहे. सहा महिन्यांत जमीन संपादनाचे काम पूर्ण करण्यासाठी 2 लाख 77 हजारांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
म्हणूनच घेतला निर्णय
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱया बोगद्यामुळे 19.43 हेक्टर जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱया जागेच्या बदल्यात तितकीच खासगी जमीन उपलब्ध करून देण्याची अट वन खात्याच्या प्रादेशिक अधिकारी समितीकडून घालण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने वन खात्याशी केलेल्या चर्चेनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत मौजे गोंड मोहाडी आणि मौजे वासनविहिरा, जिल्हा चंद्रपूर येथे पर्यायी जमीन करण्यात आली आहे.





























































