गोवर रूबेला लसीकरणाला बीड जिल्ह्यात सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड 

गोवर व रूबेला लसीकरण मोहिमेला आज बीडमध्ये मोठ्या थाटात सुरूवात झाली. शिवाजी विद्यालयामध्ये लसीकरण करण्यात आले. मोहिमेचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष सविताताई गोल्हार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण आणि आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात उपस्थित होते.

आज सकाळी गोवर, रूबेला लसीकरणाला बीड जिल्ह्यात सुरूवात झाली. भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रॅलीमध्ये उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनराज निला, जि.प.च्या उपाध्यक्षा जयश्रीताई मस्के, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सहभाग घेतला. त्यानंतर शिवाजी विद्यालयामध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. आपल्या भाषणामध्ये जि.प.अध्यक्षा सविताताई गोल्हार म्हणाल्या, गोवर व रूबेला या आजारावर विजय मिळविण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. बीड जिल्ह्यामध्ये लसीकरण यशस्वी करण्यासाठी जनजागृती उभारली जात आहे. तब्बल ७ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी ६३०० पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ३९६५ शाळांची संख्या असून ३००४ एवढ्या अंगणवाडी संख्या आहे. तिथपर्यंत लसीकरण मोहिम पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी दिनकरराव कदम, जगन्नाथ औटे, डॉ.सतीश हरदास, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, डॉ.कमलाकरराव आंधळे, डॉ.एस.आर.कदम, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे उपस्थित होते.