समता नगर पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीच मंत्र्यांना घेरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कांदिवली पूर्व येथील समता नगर पुनर्विकास प्रकल्पावरून आज विधान परिषदेत विरोधकांसह सत्ताधाऱयांनीच मंत्री शंभूराज देसाई यांना घेरले. रहिवाशांना केवळ आश्वासनांवर बोळवण करून विकासकाला पाठीशी घालू नका, रखडलेला पुनर्विकास कधीपर्यंत मार्गी लागेल ते सांगा, असा जाब विचारत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.

समता नगर येथील म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून विकासकाकडून वेळेवर भाडे देखील मिळत नसल्याबाबत आमदार श्रीकांत भारतीय यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पात नियमांचे उल्लंघन झालेले असून विकासकावर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

शासन ठोस निर्णय कधी घेणार?

प्रत्येक नागरिकाला घर मिळाले पाहिजे, असे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सांगतात. पण इथे स्वतःची घरे असूनही रहिवासी अनेक वर्षे घराबाहेर राहतायत. विकासकाकडून त्यांना भाडे वेळेवर मिळत नाही. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रकल्पासंदर्भात शासन ठोस निर्णय कधी घेणार, असा सवाल शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी केला

एप्रिलपासून पुनर्विकास, तीन महिन्यांनी आढावा 

या प्रकल्पाची रखडलेली कामे येत्या एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात येतील. या कामाच्या प्रगतीचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जाईल. या कामात दिरंगाई झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.