
आखाती देशांतील युद्धामुळे नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने निवासी शाळा, वसतिगृह आणि खाणावळी यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) ने एक आदेश जारी केला आहे.
ज्या ठिकाणी नजीकच्या परिसरात पाइपलाइनची पायाभूत सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी निवासी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, सामुदायिक स्वयंपाकघरे, अंगणवाडी स्वयंपाकघरे इत्यादींना पाच दिवसांच्या आत PNG जोडण्या (कनेक्शन्स) पुरवाव्यात, असे निर्देश सर्व शहर वायू वितरण संस्थांना दिले आहेत.
देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची गरज नाही. सर्व तेल कंपन्यांकडे इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा साखळीही पूर्णपणे सुरळीत आहे. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अनावश्यक गर्दीमुळे व्यवस्थापनावर ताण येतो, त्यामुळे गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केले आहे.


























































