दहशतवाद्यांच्या उरात धडकी भरवणार; ‘सर्जिकल स्ट्राइक स्पेशल फोर्स’

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवलेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने जोरदार हवाई हल्ला करीत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. या हल्ल्याची जगभरात चर्चा सुरू असतानाच केंद्रातील एनडीए सरकारने आता हिंदुस्थानी लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक स्पेशल फोर्स’ची स्थापना करण्याचे ठरवले आहे. एनडीए सरकारच्या या घोषणेने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या उरात धडकी भरल्याचे वृत्त आहे.

जगभरात दहशतवादाचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे भविष्यात कधीही सर्जिकल स्ट्राइक करावे लागू शकते. यामुळेच सर्जिकल स्ट्राइकसारख्या कारवाया करण्यासाठी तसेच गुप्त मोहिमा पार पाडण्यासाठी या स्पेशल फोर्सचा वापर केला जाणार आहे. एका इंग्रजी साप्ताहिकाने सूत्रांच्या हकाल्याने हे वृत्त दिले आहे. या स्पेशल फोर्समध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कमांडोंचा समावेश असेल. लष्कराच्या विशेष बलातील मेजर जनरल दर्जाचा अधिकारी या स्पेशल फोर्सच्या प्रमुख पदावर असेल.

सुरुवातीला या स्पेशल फोर्समध्ये दीडशे ते दोनशे कमांडो असतील. नंतर त्यांची संख्या वाढवण्यात येईल. 2 हजार कमांडोंची सुसज्ज फोर्स उभारण्याची योजना आहे.

सदैव सज्ज कमांडोज्

हिंदुस्थानच्या या सर्जिकल स्ट्राइक स्पेशल फोर्समध्ये लष्कराचे पॅरा कमांडो, नौदलाचे मार्केस आणि हवाई दलाचे गरुड कमांडो असतील. सुरुवातीला या स्पेशल फोर्समध्ये दीडशे ते दोनशे कमांडो असतील. नंतर त्यांची संख्या वाढवण्यात येईल.  

आपली प्रतिक्रिया द्या