
मुंबईतील कोचिंग क्लास विद्यार्थ्यांकडून मोठी फी घेतात, पण रेकॉर्डवर आकडा कमी दाखवून करचोरी करतात. अनेक क्लासेसनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. क्लासेसमध्ये दुर्घटनेच्या वेळी बचावासाठी काहीच उपाययोजना नाहीत. अशा तक्रारी आल्याने सरकारने खासगी क्लासेसवर बडगा उगारला आहे. या सर्व क्लासेसची तपासणी करण्यासाठी समिती नेमावी आणि तपासणी अहवाल 15 दिवसांत सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनात या विषयासंदर्भात एक लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यासंदर्भात सभापती राम शिंदे यांच्या दालनात आज बैठक झाली. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खासगी क्लासेसकडून विविध आमिषे दाखवली जातात. विद्यार्थी त्याला भुलतात आणि भरमसाट फी भरून क्लासमध्ये प्रवेश घेतात. पण क्लासेसकडून त्यांची फसवणूक होते. क्लास सुरू असलेली जागा सुरक्षित नसते. क्लासच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, पार्ंकग याबाबतची व्यवस्था नसते. निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खासगी क्लास सुरू करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही तपासणी करावी, असे निर्देश सभापतींनी दिले.
 
             
		




































 
     
    



















