शासन भारतीय चिकित्सापद्धतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

68

सामना प्रतिनिधी । चिखली (बुलढाणा)

केंद्र आणि राज्य शासन भारतीय चिकित्सा पद्धतीच्या विकासाकरिता कटिबद्ध असून भारतीय चिकित्सा पद्धतीच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या नूतन कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे होते. यावेळी राज्याचे आयुष संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, केंद्रीय आयुष मंत्र्यांचे सल्लागार डॉ. श्रीराम सावरीकर, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय चिकित्सापद्धती प्रति जगभरात आकर्षण वाढत असून भारताची ती जगाला दिलेली ही उत्तम देणगी आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीच्या वैद्यकीय व्यवसायींच्या विविध समस्या सोडविण्याच्या बाबतीत शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्नशील असून पुष्कळ समस्या आगामी काळात सुटलेल्या असतील असे त्यांनी प्रतिपादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर भारतीय चिकित्सा पद्धतीला चांगले दिवस येत असून या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर धोरणांची आखणी करीत आहे. सरकारच्या या सकारात्मक कामासोबतच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे ६० वर्षानंतर पहिल्यांदा स्वतःच्या वास्तूत जाणे ही अत्यंत अभिनंदनीय बाब असून कौन्सिलच्या प्रभावी कामाचे हे एक प्रतीक आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सरकारच्या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या विकासाकरिता सुरु असणार्‍या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे चांगले सहकार्य लाभेल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांनी परिषदेच्या नवीन कार्यालय उद्घाटनाला शुभेच्छा दिल्या, तसेच परिषदेच्या कामाविषयी समाधान व्यक्त करुन शासन परिषदेच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली.

यावेळी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता म्हणाले की, गत काळामध्ये कौन्सिल मधील माझ्या सर्व सहकार्‍यांनी मिळून कौन्सिलच्या कामाविषयी पाहिलेल्या स्वप्नांचा एका भागाची आज पूर्ती होत असून अजूनही राज्यातील भारतीय चिकित्सा पद्धतीच्या वैद्यकीय व्यवसायींच्या विकासाकरिता व अडचणी सोडविण्याकरिता मोठ्या प्रमाणावर आगामी काळात काम करायचा आमचा निर्धार आहे. शासनाच्या सकारात्मक व सहकार्याच्या धोरणामुळे शासनस्तरावरील अनेक प्रश्न सुटले असून काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. कौन्सिल अनेक बाबतीत स्वतःहून पुढे येऊन चाकोरीबाहेरचा विचार करून वैद्यकीय व्यवसायींच्या समस्यांचे समाधान करण्याचा व विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रभावीपणाने प्रयत्न करीत आहे. या सर्व कामांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांच्या मार्गदर्शनाने व पाठबळाने ही सर्व आव्हाने आम्ही यशस्वीपणे पार करु, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी नूतन कार्यालय निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई शहर इलाखाचे कार्यकारी अभियंता संजय इंदुरकर, सहाय्यक अभियंता सुभाष माने, कक्ष अभियंता अजय बापट, वास्तुविशारद शैलेंद्र सुराणा, कॉन्टिनेन्टल कन्स्ट्रक्शन्सचे उमेश कुमार, कंत्राटदार पिंटू जैन, मिल्टन रॉड्रिग्स, आशिष गाला, माहिती तंत्रज्ञान सल्लागार भुवनेश जोशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, आयुर्वेद विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख, विनाअनुदानित खाजगी आयुर्वेद महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. जुबेर शेख, कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सदस्य डॉ. सुरेश पाटणकर तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे सदस्य डॉ. सुनील आवारी, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. विजय दातार, डॉ. राजेंद्र ठाकूर, डॉ. संजय पाटील, डॉ. राजेश उताणे, डॉ. सचिन पांढरे, डॉ. विष्णू बावणे, डॉ. मुकुंद दिवे, डॉ. उत्तमराव महाजन, डॉ. अनुपमा शिंपी, डॉ. किरण पंडित, डॉ. बाळासाहेब हरपळे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. रफीक अहमद, प्रबंधक डॉ. दिलीप वांगे तसेच कौन्सिलच्या विविध उपसमितींचे सदस्य व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्रबंधक विनिता पुरंदरे व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम केले.

आपली प्रतिक्रिया द्या