
भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या होऊन सहा वर्षे झाली. मात्र, अजूनही न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. कोल्हापूर पोलिसांच्या तपासावरील आमचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे (ऍन्टी टेरिरीझम स्कॉड) द्यावा, अशा मागणीचे निवेदन सोमवारी भाकपच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. पानसरेंवर गोळीबार झाला. दि. 20 रोजी त्यांचा मृत्यू झाला. संशयित समीर गायकवाडला अटक झाली. त्यानंतर पाच ते सहाजणांना अटक झाली. यातील दोन संशयित आरोपी अद्यापि फरारी आहेत. या खुनातील साक्षीदाराला धमकावण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी जलदगतीने तपास करून मारेकऱयांना जेरबंद करणे व तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापि तपास अर्धवट आहे. त्यामुळे हा तपास ‘एटीएस’कडे द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक या बैठकीला गैरहजर राहिल्याने नाराजी व्यक्त केली. आपले निवेदन शासनाकडे पाठवून देतो, तसेच पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून एकत्रित बैठकीबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. यावेळी भाकपचे सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, दिलीप पवार, बी. एल. बर्गे, गिरीश फोंडे, सुमन पाटील, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, प्रशांत आंबी, ईर्शाद फरास, आरती रेडेकर, सुनीता अमृतसागर, किरण साठे, गिरीश सावंत, नागेश बांदार आदी उपस्थित होते.


























































