गोविंदा झाले समजूतदार! सरकारच्या धोरणानुसारच वागणार; कोरोनाची घुसखोरी रोखणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश मोरे

कोरोनाने अजून काढता पाय घेतलेला नाही. त्यामुळे उगाच दहीहंडीचे मानवी थर रचून तिसऱया लाटेचा धोका कशाला ओढवून घ्यायचा, असा समजूतदारपणा मुंबईच्या गोविंदा पथकांनी दाखवला आहे. पुढील काही दिवसांतील कोरोनाची परिस्थिती बघून सरकारने परवानगी दिली तरच नियम-अटींचे पालन करून हंडी फोडू. अन्यथा उत्सव नव्हे, तर प्रथा म्हणून दहीहंडी साजरी करणार असल्याची भूमिका गोविंदा पथकांनी घेतली आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी अनेक मोठमोठय़ा मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द केला. पुढे वर्षभर कोरोनाचा मुक्काम राहिल्यामुळे गोविंदांनी यंदाही सरकारकडे परवानगीसाठी अट्टहास न करण्याची भूमिका घेतली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यामुळे काही निर्बंध शिथिल झाले आहेत. असे असले तरी संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन गोविंदांनी यंदा हिंदू धर्माची प्रथा म्हणून दहीहंडी साजरी करण्याचा पवित्रा घेतला आहे.

इतर सणांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळता येऊ शकते. मात्र दहीहंडीचे मानवी थर रचण्यासाठी गोविंदांना मिठी मारूनच, हातात हात घालूनच उभे राहावे लागते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी गोविंदा पूर्णपणे सरकारच्या नियम-धोरणानुसार वागणार आहेत

सरकारने काही थरांसाठी परवानगी दिली तर तशी दहीहंडी फोडू, नाहीतर वर्षानुवर्षे ज्याठिकाणी हंडी फोडतो त्याठिकाणी मोजकेच गोविंदा जाऊन केवळ प्रथा म्हणून नारळ फोडणार असल्याचे गोविंदा पथकांनी स्पष्ट केले आहे. सरकारने दहीहंडीसंदर्भात नियमावली जारी केली की त्यानुसार आमच्या पथकांना सूचना करणार असल्याचे दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.

रक्तदान, लसीकरणासाठी गोविंदा सक्रिय राहणार

कोरोना काळात उत्सव साजरा करण्यापेक्षा अधिकाधिक मदत कशी करता येईल याकडे गोविंदा पथकांनी लक्ष दिले आहे. सरकारकडून हंडीसाठी परवानगी मिळाली नाही तर त्यादिवशी गोविंदा आपली ताकद कोरोना लढय़ासाठी वापरणार आहेत. ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदान केले जाणार आहे. तसेच त्यापुढेही कोरोना लसीकरण मोहिमेत सरकारला शक्य ती मदत करण्याचे गोविंदा पथकांनी ठरवले आहे.

आम्ही सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा करतोय. कोरोनाचे संकट वाढू नये यासाठी राज्य सरकार खबरदारी घेतेय. त्यामुळे सरकारचे नियम पाळूनच सर्व काही करू. यंदा स्पेनमध्ये 20 गोविंदांना मुभा देऊन तेथे मानवी थर रचले गेले. तशी जर इथेही मर्यादित गोविंदांच्या संख्येत मुभा दिली गेली तर आम्ही दहीहंडी साजरी करू. सरकारच्या धोरणापलीकडे आम्ही जाणार नाही.
–बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी उत्सव समन्वय समिती

गेल्या वर्षी आम्ही दहीहंडीच्या आधी संपूर्ण चुनाभट्टी परिसरात रक्तदान शिबिरे घेतली. तसेच दहीहंडीच्या दिवशी आम्ही ज्याठिकाणी थर लावतो त्याठिकाणी प्रथा म्हणून केवळ नारळ ठेवला. नंतर ‘कोरोना योद्धय़ां’चा सन्मान केला. यंदाही तसाच उपक्रम आणि मदतकार्य करणार आहोत. कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या मुलांना तसेच रोजगार गमावलेल्यांना मदत करून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणार आहोत.
–समीर सावंत, प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब, चुनाभट्टी

कोरोना महामारीने उत्सवांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. याआधी काही वर्षे दहीहंडीला न्यायालयीन पातळीवर परीक्षा द्यावी लागली. तेथून कुठे सुटका होते, तोच हे महामारीचे संकट उभे ठाकलेय. त्यामुळे आपले उत्सव लोप पावताहेत की काय, अशी भीती सतावू लागली आहे. छोटय़ा प्रमाणात का होईना, आमच्या उत्सवाला सरकारने परवानगी द्यावी अशी अपेक्षा आहे, मात्र कुठलाही अट्टहास नाही. आम्ही समन्वय समितीमार्फत सरकारला विनंती करणार आहोत. आमची भूमिका सर्वस्वी सरकारच्या धोरणाला अनुसरूनच असेल.
–अभिषेक सुर्वे, कायदेशीर सल्लागार, दहीहंडी उत्सव समन्वय समिती