मुंबईत गोविंदा मंडळांचे माणुसकीचे थर, पूरग्रस्तांना लाखोंचा मदत

413

कोल्हापूर, सांगली, कराड, कोकणात यंदा महापुराने अक्षरश: हैदोस घातला. लाखो लोकांचे संसार बुडाले. घरे कोसळली. त्यानंतर अवघ्या राज्यभरातून मदतीचा ओघ पूरग्रस्तांसाठी सुरू झाला. यंदा मुंबईतल्या मोठ्या गोविंदा मंडळांसह विविध मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द केला आणि बक्षिसाची तसेच आयोजनाची रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली. इतकेच नाही तर जिवनावश्यक वस्तूंचे ट्रकच्या ट्रक पूरग्रस्त भागासाठी रवाना केले. काही ठिकाणी दहीहंडी उत्सव साजराही झाला. परंतु तिथे ना डिजे होता

ना पाण्याचे फवारे… अत्यंत साधेपणाने केवळ परंपरा म्हणून दहीहंडीचे थर रचले गेले आणि हंड्या फोडल्या गेल्या. मात्र कुठेही जल्लोष नव्हता किंवा भव्य आयोजन नव्हते.

गोविंदा पथकांकडून मदत

प्रभादेवीच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांना 51 हजार मदत निधी जाहीर केला असून हा निधी शिवसहाय्य पूरग्रस्त निधीत जमा करण्यात येणार असल्याचे आयोजक महेश सावंत यांनी सांगितले. याशिवाय पाल्र्यातील पार्लेश्वर महिला गोिंवदा पथकाच्या वतीने 21 हजार रुपये, महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही दहीहंडी उत्सवासाठी जमा झालेले 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला.

– शिवसेना विभाग क्रमांकच्या वतीने दरवर्षी गिरगाव नाका या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा उत्सव रद्द करून 1 लाख 11 हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांना जाहीर करण्यात आली, अशी माहिती आयोजक पांडुरंग सकपाळ यांनी दिली.

– मागाठाणे येथील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला असून येत्या २६ ऑगस्ट रोजी शिवसेना नेते, युवासेना

– प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे 5 लाख रुपयांच्या मदत निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे, असे आयोजक प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

– शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दहीहंडी रद्द करून १५ लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पूरग्रस्त मदतनिधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.

दहिसरच्या संस्कार प्रतिष्ठानने पूरग्रस्तांना मदत दिली. तसेच ‘सकाळ रिलीफ फंडला’ २५ हजार रुपयांचा धनादेश दिला. दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन येथे आयोजित कार्यक्रमात पूरग्रस्त भागातील कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये असे एवूâण दीड लाख रुपये तसेच जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

सांगलीतील सुरेखा सूर्यवंशी, कोल्हापूरमधील सत्यप्पा अतवाडकर व राजू कोरी यांचे पुनर्वसन संस्कार प्रतिष्ठान करणार आहे. एन. एल. कॉम्प्लेक्स मित्र मंडळ यांनी प्रत्येक कुटुंबीयांना २० हजार रुपये अशी ६० हजारांची तर सामाजिक कार्यकर्ते आदम लांबावाला यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये अशी १५ हजारांची मदत दिली. याप्रसंगी विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, महिला आघाडी संघटक सुजाता शिंगाडे, उपविभाग संघटक शवुंâतला शेलार, दीपा पाटील, प्रिं. हंसाबेन देसाई, भालचंद्र म्हात्रे, अशोक पटेल, बाळकृष्ण धमाले, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.

संकल्प प्रतिष्ठान, वरळी  जिवनावश्यक वस्तूंची मदत

– वरळीतील संकल्प प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सव रद्द केला. संस्थेच्या वतीने पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक पाठवण्यात आल्याचे तसेच लवकरच मदत निधीही जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजक सचिन अहिर यांनी सांगितले.

– भोईवाड्याच्या सदाकांत ढवण मैदानात दरवर्षी स्प्रिंग मिल दहीहंडी उत्सव मंडळाने दहीहंडी रद्द करून 5लाख 55 हजार 555 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जाहीर केला, अशी माहिती आयोजक कालिदास कोळंकर यांनी दिली.

– घाटकोपरमध्ये राम कदम मित्र मंडळाच्या वतीने जोरदार दहीहंडी उत्सव साजरा होतो. पण यंदा या मित्र मंडळाने उत्सव साजरा न करता 30 टन धान्य, कपडे, जिवनावश्यक वस्तूंचे ट्रक पूरग्रस्त भागासाठी रवाना केल्याचे आयोजक राम कदम यांनी सांगितले.

– ताडदेवच्या जयभवानी सेवा मंडळाने यंदा 4 लाख 44 हजार 400 रुपयांचा मदत निधी पूरग्रस्तांना जाहीर केल्याचे आयोजक आणि शिवसेनेचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

119 गोविंदा जखमी

यंदा एकूण 119 गोविंदा जखमी झाले. 26 जणांवर उपचार सुरू असून 93 जखमी गोविंदांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे. नायर 13 , केईएम 27, सायन  12, जे.जे. 1, जसलोक 1, गोवंडीचे शताब्दी 2, एम.टी अग्रवाल 1, राजावाडी 18, कुपर 11,  ट्रॉमा केअर 5, व्ही.एन. देसाई 1, कांदिवलीच्या शताब्दी 6, हिंदुजा 1, जीटी 1, बॉम्बे 1 गोविंदांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या