एकमेकांपासून सहा फूट अंतर राखून बसा, कामावर हजर होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
state-government-office
प्रातिनिधिक फोटो

केंद्र सरकारने आपल्या देशभरातील कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कार्यालयात हजार राहण्याचे आदेश दिले. पण देशातील कोरोनाचा कहर लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निर्देशही जारी केले आहेत. या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून किमान 6 फूट अंतर राखून बसावे आणि शक्यतो घरातूनच जेवण आणि पिण्याचे पाणी आणावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून सरकारी कार्यालयात कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे.

नागरिकांना आवश्यक सेवा मिळावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी आपली कार्यालये 20 एप्रिलपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय निमसरकारी महामंडळांची कार्यालयेही सुरु करण्यात आली. मात्र या कार्यालयातील कर्मचारी आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी थर्मल तपासणी, माहिती नोंदणी आणि सोशल डिस्टंसिंगसारखे उपाय अमलात आणण्यात आले. सरकारी कार्यालये शिफ्ट ड्युटीत चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही एकत्र जेवणाची सुट्टी घेता येणार नाही आणि एक वेळेस 10 हुन अधिक व्यक्तींनी कार्यालयात जमू नये असेही निर्देश राज्यसभा सचिवालयाने रविवारी प्रसूत केलेल्या निवेदनात देण्यात आले आहेत.

लॉकडाऊन काळात कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीतही सूट देण्यात येणार आहे. कर्मचारी आणि नागरिकांना आपले हात सॅनिटायझरने साफ करून आणि तोंडाला मास्क लावूनच प्रवेश दिला जात आहे. कार्यालयाला भेट देणाऱ्या व्यक्तीची माहितीही या काळात नोंद केली जाणार आहे.