मध्य रेल्वेच्या लोकल जीपीएसवर धावणार!

फाईल फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱ्या आणि आपली रोजची लोकल पकडण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्यांना मध्य रेल्वे आता मोबाईल ऍपवर ट्रेनचे रिअल टाइम लोकेशन कळविणार आहे. त्यामुळे तुमची ट्रेन कुठपर्यंत आली आहे हे प्रवाशांना चुटकीसरशी आपल्या मोबाईलवर समजणार आहे.

लोकलचे नेमके स्थान दिसण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे जीपीएसचा वापर करण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणा लागू करण्यासाठी मध्य रेल्वे लवकरच कंत्राटदार निश्चित करणार आहे. या यंत्रणेसाठी मध्य रेल्वेला कोणताही खर्च येणार नसून उलट ऍप डाऊनलोड करण्यातून जमा होणाऱ्या उत्पन्नातील एक हिस्सा कंत्राटदार मध्य रेल्वेच्या खिशात जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 ‘नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम’ या ऍपद्वारे सध्या ट्रेन सेवेची माहिती मिळवता येते. या ऍपवर स्टेशनचा कोड टाइप केल्यास ट्रेनच्या आगमनाची जुजबी माहिती मिळते. हे ऍप जीपीएसवर आधारित नसून रेल्वेच्या नियंत्रण कक्षातून दिलेल्या माहितीवर काम करते. ज्यावेळी ट्रेन विस्कळीत होऊन अनेक ट्रेन रद्द कराव्या लागतात किंवा खोळंबतात त्यावेळी हे ऍप खरी माहिती देत नाही. त्यामुळे ट्रेनचे नेमके लोकेशन सांगत नसल्याने त्याच्या वाटेला प्रवासी फारसे जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ‘नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम’मध्ये हार्बरच्या गाडय़ांची माहिती मिळत नाही हा देखील त्यात एक दोष आहे. प्रवाशांना इंडिकेटर्सद्वारे योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांना असे ऍप आल्यास त्यांच्याकडून त्याचे स्वागत केले जाईल असे म्हटले जात आहे.