
>>रविप्रकाश कुलकर्णी
सर्वसाधारणपणे डॉक्टर म्हणजे डॉक्टर असे गृहीत धरलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हे डॉक्टर असतात. वैद्यकीय क्षेत्राखेरीज दुसऱया एखाद्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले असेल आणि तो प्रबंध विद्यापीठासारख्या सक्षम संस्थेकडून मान्य झाला की, त्याला डॉक्टरेट मिळते. असे डॉक्टरेट मिळालेले लोक आपल्या नावावर सर्रास डॉ. असेच लावतात. त्यामुळे अनेकदा गोंधळ झालेले आहेत.
आयर्विंग वॅलेसच्या ‘हॉटेल’ कादंबरीत त्याचे छान उदाहरण आहे. अपरात्री एका ग्राहकाची तब्येत बिघडते. तातडीने औषधोपचार करणे गरजेचे वाटते. डॉक्टर यायला अवधी लागतो. तेवढय़ात हॉटेलचा मॅनेजर आपल्याकडे आलेल्या ग्राहकात कोणी डॉक्टर आहे का, ते पाहतो. त्याला एक डॉक्टर सापडतो. मॅनेजर त्या डॉक्टरच्या सूटचा दरवाजा वाजवतो आणि आपली अडचण सांगतो. तेव्हा ते म्हणतात, “सॉरी, मी डॉक्टर नाही, तर डॉक्टरेट आहे.” डॉक्टर आणि डॉक्टरेटमधला फरक एवढय़ा चपखलपणे दाखवलेले हे एकमेव उदाहरण असेल.
असे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे पदवीधारक असतात. शिवाय या डॉक्टरेटची खात्री करून घ्यावी असाही प्रसंग क्वचितच येतो. त्यामुळेच बऱयाचदा अनेक ढुढ्ढाचार्य आपल्या मागे सर्रास डॉ. लावताना दिसतात. अगदीच कुणी हटकलं तर ते सांगतात, “लोक असे म्हणतात!”
जर असे असेल तर इतर क्षेत्रांतील पदव्यांबाबत बोलायलाच नको. उदाहरणार्थ, संगीताच्या क्षेत्रात ‘पंडित’ ही पदवी कोण देते आणि कोण ते मिरवते, हा संशोधनाचा विषय ठरावा. या अशा पंडितांचा सुळसुळाट झाल्यामुळेच की काय, राहुल देशपांडेसारख्या गायकाने जाहीरपणे सांगितले की, “मी पंडित नाही. माझ्या नावामागे ‘पंडित’ पदवी कृपया लावू नये. छापू तर अजिबात नये.” अर्थात असा एखादाच उज्ज्वल अपवाद असतो. काही विद्यापीठांत काही औपचारिक पूर्तता केल्यानंतर डॉक्टरेट मिळते असे कळते.
त्या संबंधातील ही एक हकिगत…
एका संस्थानिकाला वाटले आपल्याला विद्यापीठाची पदवी असावी. तो घोडय़ावर बसला आणि थेट विद्यापीठाच्या रजिस्ट्रार पुढे जाऊन उभा राहिला. त्या रजिस्ट्रारने संस्थानिकाला सांगितले, “हुजूर, तीन नंबरच्या काऊंटरवर जाऊन पैसे भरा. पदवी लगेच मिळेल.” अर्थात सगळे झटपट झाले. संस्थानिकांच्या मागे डॉ. बिरुद लागले. महाराज खूश झाला. घोडय़ावर बसून त्याने टाच मारली. थोडे अंतर गेल्यावर त्याच्या मनात आले, आपल्या मागे डॉ. पदवी लागली खरी, पण आपल्या घोडय़ालादेखील अशी एखादी पदवी हवी. त्याने घोडा फिरवला आणि परत ते विद्यापीठाच्या रजिस्ट्रारपुढे उभे ठाकला. आपले म्हणणे त्यांनी सांगितले तेव्हा रजिस्ट्रार नम्रपणे म्हणाले, “महाराज, आम्ही घोडय़ांना पदवी देत नाही, फक्त गाढवांनाच देतो.”
आता हे खरं की खोटे हे ज्याने त्याने ठरवावे आणि निष्कर्ष काढावा.

























































