
सामना प्रतिनिधी । कराड
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख ‘मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री’ ग्रामपंचायत बांधणी योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी,जळव, गव्हाणवाडी, गुंजाळी, उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामाच्या कामाला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने ३० जून २०१८ आणि ०३ ऑगस्ट २०१८ रोजी शासन निर्णयाव्दारे मंजूरी दिल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन राज्य सरकारने राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री’ ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सरकारने घोषित केल्यानंतर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचेकडे पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी, जळव,गव्हाणवाडी,गुंजाळी,उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामांना योजनेतंर्गत मंजुरी देवून आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत लेखी पत्राव्दारे मागणी केली होती, असे पत्रकात म्हटले आहे.
लवकरच या कामांना आवश्यक असणारा निधी सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून मिळणार असून या कामांना यंदाच्या वर्षीच सुरुवात होईल असा विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.



























































