
सामना प्रतिनिधी । अलिबाग
जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका 23 जून रोजी होत आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील चेंढरे व वरसोली या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चेंढरे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 59 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर वरसोली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 5 तर सदस्य पदासाठी 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
चेंढरे ग्रामपंचायतीच्या 6 प्रभागासाठी 17 सदस्य व सरपंच तर वरसोली ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागासाठी 15 सदस्य व सरपंच पदासाठी 23 जून रोजी निवडणूक होत आहे. अलिबाग शहराला लागून असलेल्या या दोन्ही ग्रामपंचायती प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. वरसोली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना काँग्रेस आघाडीची सत्ता आहे तर चेंढरेमध्ये शेकापची सत्ता आहे. वरसोली ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी शिवसेना, काँग्रेस, इतर मित्र पक्ष अशी ग्रामविकास आघाडी शेकापविरोधात निवडणूक रिंगणात उतरली आहे. आघाडीतर्फे प्रमिला भाटकर तर शेकपतर्फे नलिनी बना यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर चेंढरे ग्रामपंचायत निवडणूक यावेळी रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहेत.
चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप युतीकडून शेकापमधून भाजपात आलेल्या अॅड. परेश देशमुख यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेकापकडून स्वाती पाटील तर अपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिडचिठ्ठी दिलेले दत्ता ढवळे यांच्या पत्नी प्रिया ढवळे यांनी सरपंचपदाची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अलिबाग तालुक्यातील चेंढरे व वरसोली या दोन्ही ग्रामपंचायती राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेच्या असल्याने सर्वच पक्ष जिंकण्यासाठी जोर लावणार आहेत. 9 जून रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
































































