जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथे द्राक्ष महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज घाट निवासस्थान (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्यातर्फे जुन्नर द्राक्ष महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत जुन्नर तालुक्यातील द्राक्षगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळेगाव (लेण्याद्री) येथे करण्यात आले आहे. द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे किती व कोणते प्रकार, द्राक्षांपासून वाइनची निर्मिती कशी होते आदी प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर होत असलेल्या या महोत्सवात पर्यटक १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पर्यटकांना सकाळी १० वाजता माळशेज घाट येथील महामंडळाच्या निवासस्थानी पोहोचावे लागेल. त्यानंतर गोळेगाव येथील द्राक्षबागेला प्रत्यक्ष भेट देऊ न द्राक्षपिकांबाबत माहिती, द्राक्षांची तोडणी, पॅकिंग, विक्री कशी केली जाते याची पर्यटकांना माहिती दिली जाईल. पर्यटकांना बागेत जाऊन द्राक्षांची चव चाखता येईल. याशिवाय थेट शेताच्या बांधावरून द्राक्षांची खरेदी करता येणार आहे. दुपारी १ वाजता शेती पर्यटन मंडळाला भेट, शेतात फेरफटका आणि तिथेच शेताच्या बांधावर बसून जेवणाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. त्यानंतर वाईनरीला भेट देण्यात येईल. येथे पर्यटक द्राक्षापासून वाईन तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकतील. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता ग्रामीण बचत गटांच्या मशरूमबागेला भेट, मशरूम पिकाची महिती आणि या पिकाची पॅकिंग, विक्रीची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

या सर्व स्थळांना भेटी देण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये इतके प्रवेश शुल्क असून, या स्थळांना भेट देण्यासाठी महामंडळाकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकांना माळशेज घाट येथील महामंडळाच्या निवासस्थानी किंवा जुन्नर तालुक्यातील गोळेगाव (लेण्याद्री) येथे पोहोचावे लागेल, अशी माहिती एमटीडीसीकडून देण्यात आली.

दरम्यान, मुंबईतील पर्यटक कल्याण-मुरबाडमार्गे येथे पोहोचू शकतील. कल्याणपासून हे ठिकाण ९० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातील पर्यटक राजगुरूनगर-नारायणगाव-आळेफाटा मार्गे माळशेज घाट येथे पोहोचू शकतात. पुण्यापासून हे ठिकाण १२० किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक येथील पर्यटक संगमनेर-आळेफाटा येथून याठिकाणी पोहोचू शकतात.