कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; उष्णतेमुळे द्राक्ष दरात किंचित वाढ

तालुक्यात द्राक्ष हंगाम सध्या जोरात सुरू असून, तो अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे द्राक्ष दरात किंचितशी वाढ दिसून येत आहे.

कवठे महांकाळ तालुक्यात नगदी पीक व त्या पिकास पोषक वातावरण म्हणून द्राक्ष पिकाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे हे पीक तालुक्यातील बळीराजाचा आर्थिक कणाही बनले आहे. तालुक्याच्या जवळ जवळ सर्वच भागांत द्राक्षशेती केली जाते. सध्या वातावरणातील थंडीने निरोप घेतला असून, तिची जागा तीव्र उन्हाने घेतली आहे. वातावरणातील या तापमानवाढीने द्राक्षासही मागणी वाढली आहे. त्यामुळे आपसुकच दरातही किंचितशी वाढ झालेली दिसून येत आहे. पेटीला 15 ते 20 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. मोठय़ा प्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने अनेक परप्रांतीय व्यापारी द्राक्षे खरेदीसाठी संपूर्ण तालुक्यात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे.

मागील पंधरवडय़ात संपूर्ण तालुक्यात थंडी व बाजारातही द्राक्षास मागणी कमी असल्यामुळे द्राक्ष बाजारात मंदी आली होती; परंतु चालू पंधरवडय़ात वातावरणातील तापमान हळूहळू वाढू लागले आहे. त्यामुळे मुंबई, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, बांगलादेश, दिल्ली आदी भागांतून दलाल द्राक्षे खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात दाखल झाले आहेत. टेंपो, आयशर व ट्रक यांची मोठी वर्दळ वाढली आहे. मार्च महिन्यात घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून, द्राक्ष दलाल इकडे द्राक्ष खरेदीसाठी येत आहेत. पूर्वानुभव लक्षात घेता बळीराजा रोखीने व्यवहार करताना दिसत आहेत. सध्या द्राक्षाला म्हणावा तसा दर मिळत नसल्याने बऱयाच शेतकऱयांचा कल बेदाणानिर्मितीकडे दिसून येत आहे. त्यामुळे चालूवर्षी बेदाणानिर्मितीही मोठय़ा प्रमाणात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या