
आर्थिक मंदीचा सर्वांत मोठा फटका बसलेला वाहन उद्योग आणखी अडचणीत सापडला आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमधील बलाढय़ कंपनी टाटा मोटर्सने आणि नाशिकमधील बॉश कंपनीनेही ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कंपन्यांमधील काम बंद ठेवले जात असल्याने हजारो कामगारांवर बेकारीची कुऱहाड कोसळण्याची शक्यता आहे.
आर्थिक मंदीचे सर्वात आधी पडसाद उमटले वाहन उद्योगांवर. मागणी घटल्याने कंपन्यांनी उत्पादन कमी केले. उत्पादन कमी केल्याचा फटका नोकऱ्यांना बसला आणि हजारो कामगारांचा रोजगार जात आहे. एप्रिल महिन्यात महिंद्रा ऍण्ड महिंद्राने हंगामी कामगारांना घरी पाठविले.
टाटा मोटर्समध्ये सप्टेंबरमध्येही ‘ब्लॉक क्लोजर’
टाटा मोटर्सकडून सातत्याने ‘ब्लॉक क्लोजर’ घेतला जात आहे. चिखलीतील कार प्लँटमध्ये 30 मे ते 29 जून, पिंपरी प्रकल्पात (जे ब्लॉक) 1 ते 3 ऑगस्टदरम्यान ब्लॉक क्लोजर होता. 5 ते 10 ऑगस्ट असे सहा दिवस उत्पादन बंद होते. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर टाटा मोटर्सकडून 28 ते 31 ऑगस्ट ब्लॉक क्लोजर आहे. सप्टेंबरमध्येही 3 ते 6 सप्टेंबर असा चार दिवसांचा पुन्हा ब्लॉक क्लोजर आहे.
बॉशमध्येही उत्पादन बंद
डिझेल गाडय़ांसाठी लागणारे नोझल आणि इंजेक्टरचे उत्पादन बॉश कंपनीत तयार होते, मात्र डिझेल गाडय़ांची मागणीच कमी झाल्याने बॉश कंपनीचे उत्पादन आठ दिवस बंद राहणार आहे.
आजारी उद्योगांना सवलती जाहीर करा!
नकनकीन धोरणे, नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ तसेच काहन उद्योगातील मंदी यामुळे लघुउद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आजारी उद्योगांची संख्या वाढली असून त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या आगामी काळात जाणवतील. नवीन धोरणे लादल्यामुळे सुरू असलेल्या उद्योगांवर कोणते परिणाम होतील याचा विचार होत नाही. त्यामुळे बेकारीमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले. त्यामुळे सरकारकडून आजारी उद्योगांसाठी सवलती जाहीर करण्यात याव्यात, जेणेकरून उद्योगांना यातून उभे राहण्यास मदत होईल अशी मागणी देखील भोर यांनी केली आहे.
उद्योगनगरीत चिंतेचे वातावरण
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते, तर ‘टाटा मोटर्स’ हा या शहराचा कणा आहे. टाटा मोटर्सबरोबरच बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, मर्सिडीज बेंझ, एसकेएफ, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, फोकस वॅगन, प्रीमियर, फियाट, बजाज टेम्पो, जनरल मोटर्स आदी कंपन्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार उत्पादन बंद ठेवले जात आहे. यामुळे हजारो कामगार संघटना चिंतेत आहेत. गणेशोत्सव, दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसात अनेक वर्षे राबणारे कंत्राटी किंवा कायम कामगार ब्रेक मिळण्याच्या शक्यतेने हवालदिल झाले आहेत.
7 हजार लघु उद्योजक अडचणीत
पिंपरी-पुणे या औद्योगिक पट्टय़ात टाटा मोटर्ससारख्या मोठय़ा कंपन्यांवर 7 हजार लघु उद्योजक आणि छोटय़ा कंपन्या अवलंबून आहेत. तसेच सुटय़ा भागांचे विक्रेते, वितरकांचा रोजगार मोठय़ा कंपन्यांवर अवलंबून आहे. शोरूमची अवस्था बिकट आहे. छोटे उद्योग बुडीत निघण्याची भीती आहे.
250 लघुउद्योग बंद
ऑटोमोबाईल क्षेत्रातील उत्पादकांना सुटय़ा भागाचा पुरवठा करणारे 250 पेक्षा जास्त लघु उद्योग आणि त्यावर अकलंबून असलेल्या 40 ते 50 हजार कुटुंबांवर उपासमारीची केळ येईल.
ब्लॉक क्लोजर म्हणजे काय?
दर महिन्यात कामाचे दिवस साधारण 26 असतात. या कामाच्या दिवसांपैकी आठ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस एखाद्या कंपनीतील उत्पादन बंद केले जाते. या काळात कामगारांनाही घरीच थांबण्याच्या सूचना व्यवस्थापनाकडून देण्यात येतात. याला ‘ब्लॉक क्लोजर’ असे म्हणतात.



























































