
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नॉलेज पार्क परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विदेशी नागरिकाची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याची घटना घडली आहे. सेक्टर-150 मधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली. मणिपूरच्या राहणाऱ्या आरोपी तरुणीने आपल्या दक्षिण कोरियन प्रियकरावर चाकूने सपासप वार करून त्याला मृत्यूच्या दारात ढकलले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिस्टर डक जी युह (Mr Duck Jee Yuh) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा दक्षिण कोरियाचा रहिवासी होता. तो सध्या ग्रेटर नोएडा येथील एटीएस पायस हाइडवे सोसायटीमध्ये राहत होता आणि एका नामांकित मोबाईल कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तर लुंजेना पमाई असे त्या आरोपी महिलेचे नाव आहे. 4 जानेवारी 2026 रोजी जिम्स (GIMS) रुग्णालयाकडून पोलिसांना एका विदेशी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर या संपूर्ण प्रकरण उजेडात आले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मृत डक जी युह आणि आरोपी लुंजेना पमाई हे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. लुंजेना ही मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. रविवारी रात्री या दोघांनी फ्लॅटमध्ये मद्यपान करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले आणि त्याचे रूपांतर हत्येत झाले.
चौकशी दरम्यान आरोपी प्रेयसीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने सांगितले की, तिचा जोडीदार अनेकदा तिच्याशी भांडण करायचा. रविवारी रात्री पार्टी सुरू असताना त्याने पुन्हा वाद घातला आणि त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच रागाच्या भरात महिलेने घरातील चाकू उचलला आणि थेट त्याच्या छातीत खुपसला. हा वार इतका गंभीर होता की डक जी युह रक्ताच्या थारोळ्यात पडला. प्रियकराची प्रकृती खालावलेली पाहून घाबरलेल्या लुंजेनाने स्वतः त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नॉलेज पार्क पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. दोघांमध्ये अनेकदा नशेच्या विळख्यात भांडणे होत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दक्षिण कोरियाच्या दूतावासालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.


























































