ट्रम्प यांच्याविरोधात ग्रीनलँडमध्ये लोक रस्त्यावर, देश विकायला काढलेला नाही; अमेरिकेच्या दादागिरीला दिला आवाज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपमधील ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. विरोध करणाऱ्या 8 युरोपियन देशांवर ट्रम्प यांनी टॅरिफ लावले. अमेरिकेच्या या दादागिरीविरोधात ग्रीनलँडमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला आहे. हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले असून, आमचा देश विकायला काढलेला नाही असा आवाज देत तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत. ग्रीनलँडमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आंदोलन आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण ग्रीनलँडला विकत घेण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यास ग्रीनलँडच्या नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. बहुतांश बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या ग्रीनलँडमध्ये यामुळे वातावरण प्रचंड तापले आहे. ट्रम्प यांच्या विरोधात संतप्त झालेले ग्रीनलँडचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ग्रीनलँडची राजधानी असलेल्या नुउक या शहरात हजारो नागरिकांनी राष्ट्रध्वज आणि फलक हातात घेऊन ट्रम्पविरोधी नारे दिले. ‘ग्रीनलँड विक्रीसाठी नाही’, ‘आम्ही अमेरिकन नाही आणि कधी होणारही नाही’ असे नारे नागरिकांनी दिले. काही जणांनी ट्रम्प यांचे पुतळे खांद्यावर घेऊन निदर्शने केली. पोलिसांच्या माहितीनुसार, नुउक शहरातील सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या या निदर्शनांमध्ये सहभागी झाली होती. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ग्रीनलँडमधील अमेरिकन दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

युरोपियन महासंघ अमेरिकेसोबत ट्रेड अॅग्रीमेंट रोखण्याच्या तयारीत

ट्रम्प यांनी युरोपमधील 8 देशांवर टॅरिफ लावल्यानंतर युरोपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराला रोखण्याची तयारी युरापियन महासंघाने केली आहे. ग्रीनलँडवरून दिलेल्या धमक्यांमुळे या कराराला मंजुरी देणे शक्य नाही, असे युरोपियन पीपल्स पार्टीचे अध्यक्ष मॅनफ्रेड वेबर यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.

अमेरिकेला दिलेली सवलत मागे घेण्याची मागणी

अमेरिकेला युरोपियन महासंघाच्या सदस्य देशांमध्ये शून्य टॅरिफ आहे. ते रद्द करण्याची मागणी वाढू लागली आहे. काही सदस्य देशांनी देखील व्यापार करार रोखण्याची मागणी केली आहे. युरोपियन संसदेत त्यास अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. अमेरिकेसोबत व्यापार युद्ध टाळण्यासाठी युरोपियन महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी हा करार केला होता. ट्रम्प यांनी युरोपियन महासंघावर 30 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती.

8 देशांवर लावला टॅरिफ

डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड आणि फिनलँड या देशांवर 10 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. या देशांनी ट्रम्प यांना विरोध केला आहे. ग्रीनलँडबाबत कोणताही करार न झाल्यास 1 जूनपासून हे टॅरिफ 25 टक्के करू, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिलेली आहे.