
काही वेळा आपल्याकडून झालेल्या छोटाश्या चुकीमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याचा भूर्दंड आपल्यालाच नाहक सहन करावा लागतो. अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातल्या एका तरुणाच्या बाबतीत घडली आहे. कंपनीत काम करताना लोखंड कापण्याचे ग्राइंडर व्यवस्थित न पकडल्यामुळे एका मोठ्या अपघाताला या तरुणाला सामोरं जावं लागलं.
प्रयागराज जिल्ह्यातील धूमनगंज परिसरात राहाणारा जयसिंह यादव हा तरुण एका खासगी कंपनीत कामाला होता. एकदा कंपनीत काम करताना लोखंडाची सळी कापण्याचे ग्राइंडर दोन हातात पकडण्याएवजी त्याने एका हातात पकडले. लोखंडाचे वजनदार ग्राइंडर एका हातातच ग्रायंडर धरून तो लोखंडी सळी कापत होता. त्यावेळी अचानक लाईट गेले त्यामुळे त्याचा मोठा अपघात झाला. लाईट गेल्यामुळे जयसिंहच्या हातात असलेले ग्राइंडर त्याच्या हातातून निसटले. हातातून निसटलेले ग्राइंडर त्याचा हात चिरत गेले शिवाय हात पूर्ण कापत कापत ते मानेपर्यंत पोहोचले यामुळे त्याची मानही कापली गेली. ग्राइंडला असलेल्या लोखंडाच्या प्लेटमुळे जयसिंहची मान छातीपर्यंत कापली गेली शिवाय एक हातही कापला. यामुळे जखम इतकी खोलवर झाली की, त्याच्या शरीराचा आतील भाग उघडा पडला.
या अपघातानंतर जयसिंहला तात्काळ धूमनगंज येथील नारायण स्वरुप रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर त्याच्या कटुंबियांनी त्याच्या जगण्याची आशा सोडून दिली होती, कारण या पीडित तरुणाची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. पण त्याच्या कुटुंबीयांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही. जयसिंह नारायण स्वरुप रुग्णालय दाखल केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळजवळ एक तासापेक्ष जास्त वेळ ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
या घटनेबाबत त्याचे कुटुंबीय सांगतात की, आम्हाला जयसिंहच्या जगण्याची अपेक्षा नव्हती पण डॉक्टरच आमच्यासाठी देवदूत म्हणून मदतीला धावून आले. त्यांनीच त्याचे प्राण वाचवले. या तरुणावर शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवणारे डॉ. राजीव सिंह यांनी सांगितले की, आपल्याकडून झालेली एखादी छोटीशी चूक आपल्या जीवावर उठू शकते. जेव्हा त्याला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याचे बरेच रक्त वाहून गेले होते. ह्रदय पूर्णपणे बाहेर आलेले दिसत होते, पण माझ्यासोबत असलेल्या सहकारी डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेकरिता खूप कष्ट घेतले आणि त्याचा जीव वाचविला.
जर रुग्णालयात दाखल करायला उशीर झाला असता तर त्याचे प्राण वाचवणे अवघड झाले असते. त्यामुळे सर्वांनी कोणतेही काम करतांना सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरून जयच्या बाबतीत जे घडले, ते कोणाच्याही बाबतीत घडू नये, असा सल्ला तरुणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. राजीव सिंह यांनी दिला.


























































