
सूरत येथे फ्रेब्रुवारी महिन्यात झालेल्या ग्रीष्मा वकेरिया हत्याकांड प्रकरणी सत्र न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी फेनिल गोयानी याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा ठोठावण्यापूर्वी न्यायाधीशांनी त्याची तुलना कुख्यात दहशतवादी अजमल अमीर कसाबशी केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात 12 तारखेला सूरत येथे एक भयंकर घटना घडली होती. येथील ग्रीष्मा वकेरिया नावाच्या तरुणीचा फेनिलने खून केला होता. फेनिल आणि ग्रीष्मा हे एकाच वर्गात शिकत होते. फेनिलचं ग्रीष्मावर एकतर्फी प्रेम होतं. पण, ग्रीष्माने नकार दिल्याने त्याने 12 फेब्रुवारी 2022 रोजी तिची दिवसाढवळ्या भररस्त्यात हत्या केली होती. या हत्येवेळचे व्हिडीओही व्हायरल झाले होते.
या प्रकरणी फेनिलला घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सूरत सत्र न्यायालयात दररोज सुनावणी पार पडत होती. न्यायाधीश विमल व्यास यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. त्यावेळी पोलिसांनी खूप महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. फेनिल याने ग्रीष्माची हत्या ही पूर्वनियोजन करून केली होती. कारण, त्यापूर्वी त्याने अनेक दिवस आधी इंटरनेटवर हिंसक वेबसीरीज पाहणं सुरू केलं होतं. हत्येपूर्वी त्याने दोन चाकूही खरेदी केले होते. तसंच मित्राला हत्या करण्याच्या हेतूविषयी देखील सांगितलं होतं.
हत्येच्या दिवशी फेनिलने आधी कॉलेजमध्ये रेकी केली होती. ग्रीष्माचा पाठलागही केला होता. पण, तिने दुर्लक्ष केलं आणि ती घरून निघून गेली. फेनिलने तिचा पाठलाग करत तिच्या घरी गेला होता. तिथे ग्रीष्माचे काका आणि तिचा भाऊ यांवरही हल्ले केले होते. त्यानंतर ग्रीष्मावर झडप घालून त्याने आधी त्याच्या आजूबाजूला जमलेल्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. नंतर हातातील चाकूने तिचा गळा चिरला. ग्रीष्मा जागीच मरण पावली.
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना बचाव पक्षाने फेनिलची शिक्षा कमी करावी यासाठी विनंती केली. मात्र, फेनिलचं पूर्वनियोजित कृत्य, त्याला त्याच्या कृत्याबाबत नसलेला पश्चात्ताप, सर्व साक्षीदार, सीसीटीव्ही तसंच व्हायरल व्हिडीओ, चॅटिंग असे ठोस पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने या हत्येप्रकरणी फेनिलला दोषी मानलं. न्यायाधीश व्यास यांनी मनुस्मृतीमधील एका श्लोकाचा दाखल देऊन फेनिल याचं कृत्य हे दहशतवादी कसाबसारखं असल्याचं म्हणत फेनिलला फाशीची शिक्षा ठोठावली.




























































