वराने हुंडा मागितला, लग्न थांबलं.. पण अचानक तो आला अन् नववधूशी लग्न केले…काय आहे घटना…

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका लग्न सोहळ्यात विचित्र घटना घडली आहे. लग्न मंडपात हुंड्यावरून वाद झाला. यामुळे नववधूला अश्रू अनावर झाले. यावेळी लग्नात उपस्थित असलेल्या नवरीच्या कुटुंबातील एका सदस्याने नवरीसोबत विवाह केला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला. सध्या हे लग्नाचे प्रकरण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना शहरातील कोतवाली परिसरातील बंकीमध्ये घडली. उत्तर टोला येथील रहिवासी नरेश यांनी त्यांची मुलगी मोहिनी हिचे लग्न कोठी परिसरातील विकास सोनीशी करण्याचे ठरवले होते. २४ सप्टेंबरला सायंकाळी त्यांचा विवाह आयोजित केला होता. यावेळी मुलाकडच्यांनी नवरीकडे १.५ लाख रुपये रोख आणि १.५ तोळे सोने देण्याची मागणी केली.जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नवऱ्यामुलाची वरात भरमंडपातून माघारी जाईल, अशी धमकीही देण्यात आली.

नवरदेवाच्या कुटुंबाने केलेली ही मागणी नवरी मुलीला मान्य नव्हती. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की नवरीला ते सहन झाले नाही त्यामुळे ती तिच्या बहिणीकडे गेली. तेव्हा बहिणीसोबत तिचा नवरा आणि दीरही  होता. नववधूला रडताना पाहून तिच्या बहिणीच्या दिराला सहन झाले नाही. त्यामुळे त्याने सर्वांसमोर नवरीसोबत लग्न केले. यामुळे वाद आणखी पेटला आणि लग्नासाठी आलेली वरात रिकाम्या हातीच परतली.

घटनेची माहिती मिळताच, बंकी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच नवरीसोबत लग्न करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.