आजच्या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, संप मागे घेण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी 29 जानेवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. पण सरकारी नियमातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना संप पुकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने (चतुर्थ श्रेणी) 29 जानेवारीला राज्यव्यापी लाक्षणिक संपाची नोटीस दिली आहे. मात्र राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा व जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय कामकाज न थांबवता योग्य मार्गाने आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्यात, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

काम नाही तर पगार नाही

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. केंद्र शासनाचे काम नाही, वेतन नाही हे धोरण राज्य शासनानेही स्वीकारले आहे. त्यामुळे संपात सहभागी होऊ नये असे आवाहन सरकारने केले आहे.