माझगाव अग्नितांडव; जीएसटी भवनात शुकशुकाट; कडेकोट बंदोबस्त… ऑडिट सुरू!

368

माझगावमधील जीएसटी भवनात सोमवारी अग्नितांडव घडल्यानंतर आज कडेकोट बंदोबस्तात बेस्टने इमारतीचे ऑडिट सुरू केले. जीएसटी भवनात अनेक महत्त्वाच्या फाइल्स आणि कागदपत्रे असल्यामुळे भवनाबाहेर पोलीस, अग्निशमन दल यांच्या गाडय़ा उभ्या होत्या. ऑडिट सुरु असल्यामुळे आत जायला बंदी होती. दरम्यान, कालच्या अग्नितांडवामुळे भवनातील कर्मचाऱयांना मंगळवारी आणि बुधवारी (शिवजयंतीनिमित्त) अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या जीएसटी भवनात आज शुकशुकाट होता.

माझगावमधील जीएसटी भवनाला सोमवारी साडेबारा वाजता लागलेल्या आगीत भवनाचे तीन मजले जळून खाक झाले. यात काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फायलीही जळाल्याचे म्हटले जात आहे. सुदैवाने या आगीतून भवनातील 2 ते अडीच हजार कर्मचारी बचावले. आगीनंतर बेस्टने तातडीने इमारतीचा वीजपुरवठा तोडला होता. त्या पार्श्वभूमीवर आज बेस्टने जीएसटी भवनचे इमारतीचे ऑडिट सुरू केले. उद्या अग्निशमन दल ऑडिट करणार आहे. ऑडिटचे हे काम पूर्ण झाल्यावर आणि काम करण्यास परवानगी मिळाल्यानंतरच इमारतीत पहिल्यासारखे कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, भवनात आज जीएसटी आयुक्तांसह इतर अनेक अधिकारी उपस्थित होते. काही कर्मचारीही आले होते. मात्र, ऑडिटचे काम सुरू असल्यामुळे त्यांना इमारतीच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

सर्व सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करा

अनेक सरकारी इमारतींमध्ये बाहेर कॉरिडोरमध्येही महत्त्वाची कागदपत्रे ठेवली जातात. त्यामुळे आग लागली तर हीच कागदपत्रे प्रथम जळून खाक होतात. अशा आगीबाबत सगळय़ांच्या मनात शंका निर्माण होते. त्यामुळे सर्व सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करा, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. जीएसटी भवनाला लागलेल्या आगीबद्दल स्थायी समिती सदस्यांच्या मनात शंका आहे. ही आग का, कशी लागली याची संपूर्ण माहिती समितीला सादर करा, अशी मागणी आज स्थायी समितीत सर्व सदस्यांनी केली.

चौकशी सुरू, मात्र, नोटीस देऊ शकत नाही

जीएसटी भवनला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, अग्निशमन दलाकडून रीतसर चौकशी सुरू आहे. येत्या 3 ते 4 दिवसांतच याचा अहवाल सादर करण्यात येईल. अग्निशमन दलाकडून मुंबईत सर्व ठिकाणी लागलेल्या आगी विझवल्या जातात. यामध्ये सरकारी इमारतींचाही समावेश असतो. मात्र, महाराष्ट्र फायर ऍक्टमधील तरतुदीनुसार पालिका सरकारी इमारतींच्या फायर ऑडिटबाबत नोटीस देऊ शकत नाही, असे स्पस्ट प्रतिपादन मुंबई अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

आणखी 35 अग्निशमन केंद्रांची गरज

माझगावच्या जीएसटी भवनाला लागलेल्या आगीवर आज स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. त्यावर अग्निशमन दलाने आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत अग्निशमन दलाची 35 केंद्रे आहेत. मात्र, तरीही मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता आणखी 35 केंद्रांची गरज असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी स्थायी समितीला सांगितले.

पोलिसांना प्रतीक्षा अग्निशमन दलाच्या अहवालाची

माझगाव येथील नऊ मजली जीएसटी भवनात नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या अहवालानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. लवकरच फॉरेन्सिक लॅबची टीम देखील घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे. सोमवारी दुपारी जीएसटी भवनाला आग लागली. तीन तासात तीन मजले जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत काही फाईल जळाल्या आहेत. त्याचा आढावा घेण्यात येत आहे. नेमकी आग कशी लागली हे अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर अनेक बाबीचा उलगडा होणार आहे. पोलिसांना अग्निशमन दलाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील तपासाची दिशा ठरवणार आहेत. फॉरेन्सिक लॅबची टीमदेखील घटनास्थळी जाणार आहे. आग लागलेल्या मजल्यावर जाऊन फॉरेन्सिकची टीम पाहणी करतील. त्यानंतर ते आगीची कारण शोधून त्याबाबतचा गोपनीय अहवाल पोलिसांना देतील.

आपली प्रतिक्रिया द्या