जेएनयूनंतर अहमदाबाद येथे विद्यार्थ्यांमध्ये राडा, ABVP-NSUI कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीतील जेएनयूमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण आता देशातील अनेक शहरात पसरू लागले आहे. मंगळवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये अभाविप आणि एनएसयूआय NSUI-ABVP च्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. अभाविपच्या कार्यालयासमोरच दोन्ही गट आपसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूंनी लाठ्या काठ्या चालवल्या गेल्या. यात अनेक जण जखमी झाले आहेत.

जेएनयू घटनेस विरोध दर्शवण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच ABVP च्या कार्यालयाबाहेर  NSUI चे कार्यकर्ते विरोध प्रदर्शन करत होते. त्याचदरम्यान दोन्ही विदर्यार्थ्यांच्या गटात बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले.

पाच जानेवारी रोजी जेएनयूमध्ये चेहरे झाकलेल्या टोळक्याने जबरदस्तीने विद्यापीठात प्रवेश करत विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली होती. हे हल्लेखोर अभाविपचे असल्याचा आरोप होत आहे. तर अभाविपने तो फेटळून लावला आहे. या मारहाणीचे तीव्र पडसाद देशभरातील कॉलेजमध्ये उमटत आहेत.

याचपार्श्वभूमीवर सोमवारी बंगालमधील जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही जेएनयू हल्ल्याचा निषेद केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यावेळी विद्यार्थी आणि पोलीसही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया य़ेथेही सोमवारी जेएनयू हिंसाचाराविरोधात जोरदार प्रदर्शन करण्यात आले. यात आंदोलनात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीजही सहभागी झाल्या होत्या. अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विशाल भारद्वाज यासारखे अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी कश्मीरचे पोस्टर्सही झळकवण्यात आले. ज्याच्यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.