IPL 2025 – गुजरातसमोर हैदरा’बाद’, विजयाचा अभिषेक नाहीच

गेल्या मोसमात षटकारबाजी करण्यात अक्वल असलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना यंदा सूरच गवसला नाही. शुभमन गिल, जोस बटलर आणि साई सुदर्शनच्या फटकेबाजीमुळे गुजरातने उभारलेले 225 धावांचे आव्हान हैदराबादला झेपलेच नाही आणि गुजरातने सातव्या विजयासह गुणतालिकेत दुसऱया स्थानावर झेप घेत आपले प्ले ऑफचे स्थान अधिक बळकट केले. दुसरीकडे सात पराभवांमुळे गतउपविजेत्या हैदराबादला साखळीतच बाद व्हावे लागणार आहे. त्यांचे आव्हान संपले असले तरी त्यांना विजयाचा खणखणीत चौकार आणि प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या प्रतिस्पर्ध्यांची हार असा दुहेरी चमत्कार संजीवनी देऊ शकतो. पण सध्या हे शक्य नाही.

गिलबटलरचा दणका

हैदराबादने टॉस जिंकला आणि गुजरात फलंदाजीला बोलावण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे गोलंदाज या निर्णयाला सार्थकी लावू शकले नाही. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी नेहमीप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवल्या. अवघ्या 6.5 षटकांत 87 धावांची सलामी देताना सुदर्शनने 23 चेंडूंत 48 धावा ठोकल्या. त्याला सहाव्या अर्धशतकाची संधी होती, पण ती हुकली. यानंतर गिलची गट्टी जोस बटलरसह जमली. या दोघांनीही 6.1 षटकांत 62 धावांची भागी केली. गिलला आज शतकाची संधी होती, पण तो 38 चेंडूंत 76 धावा ठोकून बाद झाला. मग बटलरने 64 धावांची खेळी केली. त्यामुळे गुजरातला या मोसमात पाचव्यांदा द्विशतकी टप्पा गाठता आला. गुजरातने आपल्या आघाडीवीरांच्या तुफानी फलंदाजीमुळे 6 बाद 224 अशी जबरदस्त मजल मारली.

ऑरेंज कॅप पुन्हा सुदर्शनच्या डोक्यावर

गुजरातचा साई सुदर्शन ऑरेंज कॅपपासून फार दिवस दूर राहू शकला नाही. कालच सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला मागे टाकत ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली होती तर आज साईने 23 चेंडूंत 48 धावांची घणाघाती खेळी करत सर्वप्रथम या मोसमात 500 धावांचा टप्पा गाठण्याचा मान मिळवला.

विजयाचा अभिषेक नाहीच

विजयासाठी 225 धावांचा पाठलाग करणाऱया हैदराबाद सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माकडूनच झंझावाताची अपेक्षा होती.  पण ही जोडी 49 धावांचीच सलामी देऊ शकली. हेडने 16 चेंडूंत 20 धावांची माफक खेळी केली. त्यानंतर अभिषेकने आपला झंझावात दाखवत गुजरातला दबावाखाली आणले. पण अभिषेकला इशान किशन, हेनरीक क्लासन या दिग्गजांची अपेक्षित साथ लाभली नाही. त्यामुळे शर्माला आपल्या संघाला विजयाचा अभिषेक घालताच आला नाही. अभिषेकने 41 चेंडूंत 74 धावा ठोकताना काहीकाळ हैदराबादच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तो बाद झाल्यानंतर पुणीही गुजरातच्या गोलंदाजांवर रॉकेट हल्ले चढवू शकला नाही. प्रसिध कृष्णाने हेड आणि क्लासनची विकेट काढत 19 विकेटसह पुन्हा एकदा पर्पल कॅप आपल्या डोक्यावर चढवली. नितीश रेड्डी आणि पॅट कमिन्सला 19 चेंडूंत 80 धावा काढायच्या होत्या, पण ही जोडी 41 धावाच काढू शकली आणि हैदराबादला 38 धावांनी हार सहन करावी लागली. या पराभवामुळे हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा अधिक अंधुक झाल्या आहेत.