
देशात सध्या कोविड लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. मात्र या संकटातही गुजरात भाजपने आपली पोळी भाजून घेण्यासाठी रेमडेसिवीरच्या साठेबाजीचा कहर केला आहे. पक्षाने सुरत कार्यालयातून रेमडेसिवीरचे मोफत वाटप सुरू केले आहे. देशात रेमडेसिवीर मिळत नसताना भाजपने हे इंजेक्शन कोठून व कसे मिळवले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सोशल मीडियात मोफत इंजेक्शन वाटपाची जाहिरातबाजीही केली. त्यामुळे उधना विभागातील भाजप कार्यालयाबाहेर इंजेक्शन घेण्यासाठी शनिवारी हजारो लोकांनी भलीमोठी रांग लावली होती. विशेष म्हणजे, इतर राज्यांप्रमाणेच गुजरातमधील पालिका व सरकारी रुग्णालयांतही रेमडेसिवीरचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा आहे. असे असतानाही भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी गरजू लोकांबद्दल कळवळा दाखवत पक्षाच्या कार्यालयातून मोफत 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार असल्याची घोषणा केली. बाजारात उपलब्ध नसलेले इंजेक्शन भाजपने कुठून मिळवले, असा सवाल करीत विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच या साठेबाजीची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
इंजेक्शनच्या साठेबाजीबाबत मुख्यमंत्री रूपाणींचे हात वर
भाजप कार्यालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठेबाजीबाबत मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मात्र हात वर केले. भाजप कार्यालयाला सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन दिलेली नाहीत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ही इंजेक्शने कुठून आणि कशी मिळवली हे त्यांनाच विचारा, असे उत्तर मुख्यमंत्री रूपाणी यांनी दिले. दरम्यान, भाजपने इंजेक्शनच्या मोफत वितरणाबाबत केमिस्टशी हातमिळवणी केली असेल, अशी प्रतिक्रिया सुरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली.
निर्यातीवर बंदी केंद्राचा मोठा निर्णय
कोरोना रुग्णसंख्येत चिंतनीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशातील कोरोना फैलाव आटोक्यात येत नाही तोपर्यंत रेमडेसिवीरची निर्यात बंद राहील, असे आदेश सरकारने संबंधित सर्व औषध पंपन्यांना दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आदी अनेक राज्यांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्या अनुषंगाने सरकारने निर्यातबंदीचे पाऊल उचलले आहे.
मृत्युदर
मार्च 2020 – 12.39 टक्के
मार्च 2021 – 0.26 टक्के
एप्रिल – 0.04 टक्के




























































