राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांचा राजीनामा!

1341

राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे. चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी एका आमदारानेही राजीनामा दिला आहे. या आमदारांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवला आहे. विधानसभा अध्यक्ष सोमवारी राजीनामा देणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृतपणे राजीनामा देणाऱ्या आमदारांची माहिती मिळालेली नाही. प्रवीण मारू यांनी आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.

राजीनामा देणाऱ्या आमदारांमध्ये जे.व्ही. काकडिया आणि सोमाभाई पटेल यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन आमदार गायब असून त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. तसेच ते काँग्रेसच्या संपर्कात नसल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मंगल गावीत आणि प्रद्युमन सिंह जाडेजा यांनीही राजीनामा दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रवीण मारू या आमदाराने आपण दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्येही काँग्रेसला धक्का बसल्याने काँग्रेसने आपले आमदार फूटू नयेत, यासाठी शनिवारी 14 आमदारांना जयपूरला हलवले होते. पाच आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आपल्या इतर आमदारांनाही जयपूरला हलवणार आहे. तसेच या आमदारांसह काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसचे 10 ते 12 आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या