
गुजरातमध्ये आता लग्न करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे. त्यासाठी राज्यातील भाजप सरकार 20 वर्षांपूर्वीच्या विवाह नोंदणी कायद्यामध्ये बदल करणार आहे. लव्ह जिहादचे कारण देत सरकारने हे पाऊल उचलले आहे.
राज्यातील काही संघटनांकडून विवाह कायद्यात बदलाची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नुकताच विधानसभेत हा प्रस्ताव सादर केला. प्रस्तावाचे समर्थन करताना संघवी यांनी पंचमहल जिह्याचा दाखला दिला. या जिह्यातील एका भागात एकही मुस्लिम नाही किंवा मशीद नाही, तरीही तिथे निकाहाची शेकडो प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. बनासकांठा, नवसारी आणि मेहसाना जिह्यातही असे प्रकार घडले आहेत, असे संघवी यांनी सांगितले.
प्रेमविवाहाला विरोध नाही, पण…
‘आमचे सरकार प्रेमविवाहाच्या विरोधात नाही, मात्र मुलींचा सन्मान आणि सनातन धर्माची सुरक्षा महत्त्वाची आहे. हा जनहिताचा मुद्दा आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली सध्या एक खेळ खेळला जात आहे. त्यापासून मुलींना वाचवण्यासाठी एक मजबूत ढाल गरजेची आहे,’ असे उपमुख्यमंत्री संघवी म्हणाले.
सुधारित कायद्यात काय?
n लग्नासाठी आई-वडिलांची परवानगी आवश्यक असेल. n विवाह नोंदणीसाठी अर्ज आल्यास त्याची माहिती मुला-मुलींच्या आई-वडिलांना कळवली जाईल. n नव्या कायद्यानुसार, विवाहाची नोंदणी होण्यासाठी किमान 30 दिवस लागतील.
एखादा सलीम ओळख बदलून सुरेश झाला आणि त्यानं निष्पाप मुलींना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अद्दल घडवली जाईल.




























































