
गुजरातच्या गोध्रा जळीतकांडानंतर बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या 14 जणांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल गुरुवारी पुन्हा लांबणीवर पडला. दोन आरोपींच्या कथित सहभागाबाबत मुंबई सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. मात्र उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या प्रकरणांच्या सुनावणीकामी सध्या न्यायालय व्यस्त आहे. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी बेस्ट बेकरी खटल्याची सुनावणी 25 मेपर्यंत पुढे ढकलली.
1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला होता. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली होती. जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. सत्र न्यायालयात एकूण चार आरोपींविरुद्ध खटला उभा राहिला होता. मात्र दोघा आरोपींचा मृत्यू झाला. सोलंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण 10 साक्षीदार तपासले आहेत. हे दोघे दोषी की निर्दोष, याचा अंतिम निकाल सत्र न्यायालय देणार आहे. सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने 17 जानेवारीला निकाल राखून ठेवला होता. मात्र उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या प्रकरणांच्या सुनावणीमध्ये सत्र न्यायालय व्यस्त असल्यामुळे बेस्ट बेकरी खटल्याचा निकाल लांबणीवर पडला आहे. बेस्ट बेकरी हत्याकांड घडून तब्बल 21 वर्षे उलटल्यानंतर 2 आरोपींच्या सहभागाबाबत न्यायालय फैसला सुनावणार आहे.

























































