
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
पाण्याच्या समस्येने त्रासलेली एक महिला गुजरातमधले भाजप आमदार बलराम थवानी यांच्याकडे तक्रार घेऊन गेली, तर या आमदाराने तिला लाथाबुक्क्याने बेदम बदडले. ही महिला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची नेता असल्याचे म्हटले जाते. रविवारी ती आमदाराकडे तक्रार घेऊन गेली होती. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठीच खळबळ माजली आहे. त्यानंतर भाजप आमदार ताळय़ावर आला आणि त्याने त्या महिलेची माफी तर मागितलीच, पण राखीही बांधून घेतली!
नीतू तेजवानी असे या पीडित महिलेचे नाव असून याबाबत बोलताना ती म्हणाली, नरोदा भागात पाण्याची भीषण समस्या आहे. त्याबाबत सांगण्यासाठी मी आमदार थवानी यांच्याकडे गेले होते, पण तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनी मला मारायलाच सुरुवात केली. मी खाली पडले तेव्हा त्याने मला लाथाबुक्क्याने मारले. त्याच्या समर्थकांनी माझ्या पतीलाही बेदम मारले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायचे आहे की, गुजरातमध्ये भाजपच्या शासन काळात महिला सुरक्षित राहू शकतील की नाही?
दरम्यान, या घटनेबाबत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ट्विटरवर म्हटले की, अहमदाबादमधील नरोदा येथील पाण्याची समस्या घेऊन गेलेल्या महिलेला आमदार बलराम थवानी यांनी केलेली मारहाण निश्चितच घृणास्पद आहे. गुजरात पोलिसांनी या उन्मत्त आमदाराला लगेच बेड्या ठोकायला हव्यात. मारहाणीची घटना व्हायरल झाल्यावर आमदार थवानी यांना आपली चूक उमगली. ते म्हणाले, मी जाणूनबुजून हे केले नाही. गेली 22 वर्षे मी राजकारणात आहे, पण अशी कृती माझ्या हातून कधीच घडली नाही. मी त्या महिलेची जाहीर माफी मागतो.

























































