
सेल्फीचा नाद जीवघेणा ठरू शकतो हे माहित असूनदेखील सेल्फीच क्रेझ कमी होताना दिसत नाहीये. अशाच एका सेल्फी वेड्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
गुजरातमधील गिरच्या जंगलात सिंहीणीसमोर स्टाईलमध्ये पहुडलेला एक व्यक्ती या व्हिडीओत दिसत आहे. तर गर्द झाडाच्या खाली बसलेली सिंहीण त्या व्यक्तीचे वेडेचाळे शांतपणे बघताना यात दिसते. तर सेल्फी व्हिडीओकडे बघून संबंधित व्यक्ती हसताना ,बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकजणांनी यावर टीका केली आहे. प्राण्यांना त्रास देणे योग्य नसून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणीही काहीजणांनी केली आहे.
गिरच्या जंगलात सिंह मुक्त संचार करताना आढळत असल्याने जगभरातील पर्यंटक येथे दरवर्षी गर्दी करतात. यामुळे पर्यंटकांच्या सुरक्षेबरोबरच प्राण्यांच्या देखभालीसाठी येथे खास उपाययोजना केलेल्या आहेत. पण असे असतानाही संबंधित व्यक्तीने सिंहीणबरोबर व्हिडीओ काढलाच कसा असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे.
त्यातही गिरमधील सिंहाचे वेगळे वैशिष्टय आहे. यामुळे येथील सिंह कायम चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच सिंहाचे एक कुटुंब बिबट्याच्या बछड्याचा सांभाळ करत असल्याचे आढळले होते. तब्बल 45 दिवस या कुटुंबाने या बछड्याचा सांभाळ केला. पण नंतर एका दुर्मिळ आजाराने त्याचा मृत्यू झाला.



























































